शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्या इशाऱ्याला दिले प्रत्युत्तर
कल्याण दि.30 सप्टेंबर :
देशात आणि राज्यात, भारतीय जनता पक्ष कायम आपल्या सहकारी पक्षांना बरोबर घेऊन काम करीत आहे. भाऊ छोटा असो किंवा मोठा त्याने भावासारखं वागलं पाहिजे, हीच भूमिका आमची महायुतीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक महत्वपूर्ण योजना शेवटच्या गरजू माणसापर्यंत पोहचवण्याचे काम गेली १० वर्षांपासून करीत आहे. जनतेसाठी कायम कार्यरत राहणं हे माझ्यावरील संस्कार आहे. यात बंडखोरीचा विषय आला कुठे? ज्यांनी खंजीर खुपसण्याची भाषा केली. त्यांनी भिवंडी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी काम करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, असे प्रत्यूत्तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिले.(BJP’s defeat in Bhiwandi Lok Sabha is due to non-cooperation of Shiv Sena Shinde faction – former MLA Narendra Pawar)
शिवसेना शिंदे गटाचे भिवंडी जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या सामाजिक कार्यावर बोट ठेवत, बंडखोरीच्या आणि पाठीत खंजीर खुपसण्याच्या विधानावर ते बोलत होते.
निवडणुका आल्या की मगच काम, हे माझ्या सामाजिक – राजकीय कामाचे सूत्र नाही. सतत कार्यरत राहून सामाजिक – राजकीय प्रवास मी आजवर केला आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत जनतेने मला कल्याण पश्चिम विधानसभेचं नेतृत्व देऊन आमदार केले. त्या ५ वर्षाच्या कालावधीत आपण अनेक विकासकामे केली. त्यानंतर सन २०१९ च्या निवडणुकीत जनता आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे अपक्ष निवडणुकीला सामोरे गेलो असता दुसर्या क्रमांकाची ४४ हजार मते मिळवली. निवडणुकीत पराभव झाला म्हणून काम करणे सोडले नाही. या उलट पराभव झाल्यानंतर लगेच तातडीने कामाला सुरुवात केली आणि आजही करत असल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले.
तर लाडकी बहीण, महात्मा फुले आरोग्यदायी योजना, मुख्यमंत्री सहाय्यता योजना, आभा व आयुष्यमान आरोगी विमा योजना, मुद्रा योजना, कौशल्य विकास योजना, विश्वकर्मा योजना, एक दिवासीय दाखले वाटप, आधारकार्ड, स्वच्छता अभियान, वृक्षा रोपण, वह्या वाटप, प्रश्नसंच वाटप, रस्ते विकास – चौक सुशोभीकरण आदी योजना आपण जनसंपर्क कार्यालयातून सक्षमपणे राबवतोय, नागरिकांनाही त्याचा लाभ मिळत असून याचा आपल्याला आनंद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तर आपण माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून महायुतीची कामे जनतेपर्यंत पोहचवतोय, काम करतोय. यात काही गैर नाही. खासदारकीच्या निवडणुकीत भिवंडी लोकसभा क्षेत्रात या लोकांनीच महायुतीत मिठाचा खडा टाकला. त्यांच्या असहकार्यामुळेच भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीत खंजीर खुपसणार्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही असे प्रत्युत्तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांना दिले आहे.