संथगतीने कामे सुरू असल्याबाबत अध्यक्ष वरुण पाटील यांची नाराजी
कल्याण दि.2 सप्टेंबर :
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची प्रमुख संस्था असलेल्या कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या शिष्टमंडळाने आज केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. रस्त्यांवर पडलेले खड्डे, अस्वच्छता आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर केडीएमसीकडून अतिशय संथपणे कामे सुरू असल्याबाबत महामंडळाचे अध्यक्ष वरुण पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Potholes on roads – Unsanitary: Delegation of Public Ganeshotsav Corporation met KDMC Commissioner)
गणेशोत्सव तोंडावर आला असला तरी अद्याप शहरात जागोजागी प्रचंड खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे, हेही कमी म्हणून की काय त्याचजोडीला काही ठिकाणी अस्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे. मात्र त्यासाठी केडीएमसीकडून अतिशय संथगतीने कार्यवाही सुरू असल्याचे महामंडळातर्फे आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सार्वजनिक किंवा घरगुती गणपती आणणे अडचणीचे ठरणार असल्याचा महत्त्वाचा मुद्दाही सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून या बैठकीत मांडण्यात आला.
केडीएमसी आयुक्तांसोबत झालेल्या या बैठकीमध्ये शहरातील स्वच्छता, पथदिवे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या परवानग्या, विसर्जन घाटावरील अपूर्ण तयारी आदी प्रमूख विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष वरुण पाटील यांनी दिली आहे. तर ही सर्व कामे येत्या 1-2 दिवसांत आम्ही पूर्ण करू असे आश्वासन केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या शिष्टमंडळाला दिल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष वरुण पाटील यांच्यासह महामंडळाचे विजय कडव, राकेश मुथा, प्रतीक पेणकर, सुधीर वायले, महेश बनकर, सागर भालेकर, कुणाल गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.