शहरप्रमुख रवी पाटील यांच्याकडून शहाड उड्डाणपूलाची पाहणी
कल्याण दि.31 ऑगस्ट :
कल्याण – मुरबाड मार्गाला जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61वरील शहाड उड्डाणपुलाची खड्ड्यांमुळे अक्षरशः दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांमुळे याठिकाणी वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हे खड्डे येत्या दोन दिवसांत भरले नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी नॅशनल हायवे, केडीएमसी, पीडब्ल्यूडी आणि एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना दिला आहे. रवी पाटील यांच्याकडून आज नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत शहाड उड्डाणपुलाची पाहणी करण्यात आली. (Fill potholes on Shahad bridge in two days, otherwise Shivsena style protest – city chief warns all four administrations)
शहाड पुलावर रोज दोन दोन तास वाहतूक कोंडी...
कल्याण – मुरबाड आणि कल्याण – नगर या राष्ट्रीय महामार्गा क्रमांक 61ला जोडण्यासाठी शहाड येथील उड्डाणपूल अतिशय महत्त्वाचा आहे. परिणामी या मार्गावरुन दररोज हजारो लहान मोठी वाहने धावत असतात. परंतू पावसामुळे या उड्डाणपुलावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून त्याचा मोठा परिणाम या वाहतुकीवर होत आहे. दररोज याठिकाणी किमान दोन दोन तास वाहतूक कोंडी होत असून त्याचा फटका शालेय विद्यार्थी, अँब्युलन्स, फुले – भाजीपाल्याच्या गाड्यांसह हजारो नागरिकांना बसत आहे. हा उड्डाणपूल नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो.
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी शहर खड्डेमुक्त करा…
या पार्श्वभूमीवर शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी आज दुपारी नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या ठाणे विभागीय शाखा अभियंता सविता सांगळे यांच्यासमवेत या उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे कामाच्या दर्जाबाबत जाबही विचारला. तर गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून येत्या दोन दिवसात या उड्डाणपूलावरील खड्डे भरले गेले नाही, तर शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशाराही पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला. तसेच कल्याण पश्चिमेतील इतर सर्व रस्तेही गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी खड्डेमुक्त करण्याचे आवाहन पाटील यांनी केडीएमसी, एमएसआरडीसी आणि पीडब्ल्यूडी विभागाला केले आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या तंत्रज्ञानाने खड्डे भरणार…
त्यावर शाखा अभियंता सविता सांगळे यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई गोवा महामार्गाच्या धर्तीवर जिओ पॉलिमर टेक्नोपॅच तंत्रज्ञानाने शहाड पुलावरील खड्डे भरण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच उड्डाणपूलावरील खड्डे भरण्यासाठी रात्रीच्या वेळेत काम केले जाईल असेही सांगळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांच्यासह भावेश अवसरे, कैलाश ढोणे दीपक धनावडे, सागर पाटील, राम मुसळे, शरद जाधव, गुलाब पाटील, दुर्गेश पाटील, विजय कोट अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.