नवी मुंबई दि.16 :
डोंबिवली (घेसरगाव) येथून खासगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर 15 जुलै रोजी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातातील मृत व्यक्तींना शासनातर्फे 5 लाख रुपये मदत देण्याचे आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.(Varkari bus accident: 5 lakhs for the dead and free treatment for the injured – Chief Minister Eknath Shinde)
नवीमुंबई येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देऊन जखमींची विचारपूस केली. शासन आपल्या पाठीशी असल्याचे रुग्णांना सांगत जखमींवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचाराबाबत अधिक माहितीही जाणून घेतली. अतीदक्षता विभागात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांना अधिक उपचारासाठी अन्य रुग्णालयात स्थलांतरीत करावे लागल्यास तसे करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
खासगी बस आणि ट्रॅक्टर यांच्या मध्ये झालेल्या अपघातात 46 जखमी आहेत. त्यापैकी 7 वारकरी गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी झालेल्या अपघाताची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.