टी. राजा यांच्या सभेवरून आजी – माजी खासदारांमध्ये सुरू झालेला वाद थांबेना
कल्याण दि.17 जून :
काही दिवसांपूर्वी पडघ्यामध्ये झालेल्या टी.राजा यांच्या सभेवरुन भिवंडी लोकसभेतील आजी – माजी खासदारांमधील द्वंद्व युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. या दोन्ही नेत्यांमधील वाद आता बुद्धीमत्तेवर येऊन ठेपला असून कपिल पाटील यांच्या बुद्धीमत्तेची कीव येत असल्याची कडवी टिका नवनिर्वाचित खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी केली आहे. (Newly elected MP Suresh Balya Mama Mhatre criticises of former mp kapil patil)
कपिल पाटील हे सपशेल खोटे बोलत आहेत…
पडघ्यात झालेल्या सभेला विरोध केला नव्हता तर अनेक गुन्हे दाखल असलेल्या टी.राजा यांच्याबाबत आक्षेप होता. आणि कपिल पाटील हे सपशेल खोटे बोलत असून आपल्याकडे एक बॅनर आहे ज्यामध्ये कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा दावा खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी त्यांच्या मोबाईलमधील बॅनर दाखवत केला.
पाटील यांनी बुद्धीमत्ता तपासून घ्यावी…
तर कपिल पाटील यांच्याच पक्षाचे दोन खासदारांनी जाहीररीत्या सांगितले होते की आम्हाला संविधान बदलण्यासाठी 400 पारचा नारा दिला होता. पडघ्यातील सभेतही टी. राजा यांनी भारताला हिंदूराष्ट्र बनविण्यासाठी 400 पार जागा पाहिजे होत्या असे सांगत सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी कपिल पाटील यांनी त्यांची बुद्धीमत्ता तपासून घ्यावी, त्याची आपल्याला कीव येत असल्याची कडवी टिकाही म्हात्रे यांनी केली आहे.
त्यांच्या कायदेशीर कारवाईची वाट पाहतोय…
तर कपिल पाटील यांनी मला एक नोटीस पाठवली तर आपल्याकडे बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, क्रशर, हायवेवरील गाळे असे त्यांचे दहा मॅटर आहेत. त्यांची एक नोटीस आली तर त्यांच्या दहा शासकीय चौकशीचे आदेश निघतील असा इशारा देत आपण त्यांच्या कायदेशीर कारवाईची वाट पाहत असल्याचे सांगत खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी त्यांना आव्हान दिले.
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून या दोन्ही आजी माजी खासदारांमध्ये सुरू झालेला हा वाद दिवसागणिक वाढत चाललेला दिसत आहे.