निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात केली घोषणा
कल्याण दि.15 जून :
2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील चुकांमधून आपण भरपूर काही शिकलो आहोत. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या 2024 च्या निवडणुकीचे राजकीय गणित तयार असून कल्याण पूर्व असो की पश्चिम कोणत्याही परिस्थितीत आपण या निवडणुकीमध्ये उभे राहणार असल्याची घोषणा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केली आहे. (will stand in the Legislative Assembly election whether it is Kalyan East or West)
कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांची प्रमूख संघटना असलेल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात सचिन पोटे यांनी आपली राजकीय कारकीर्द, लोकसभा निवडणुकीतील अनुभव, दबावाचे राजकारण, दहा वर्षांत पक्ष सोडून गेलेले नेते, कल्याण डोंबिवलीतील नागरी समस्या, कल्याण जिल्हा काँग्रेसची सद्यस्थिती अशा विविध विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा केली.
महाराष्ट्रात महविकास आघाडीचेच सरकार पुन्हा येणार…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यातून गेली, त्या सर्वठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकले आहेत. महाराष्ट्रामध्ये आम्ही नंबर एकचा पक्ष असून 100 ते 140 विधानसभा मतदारसंघात आम्हाला चांगला लीड आहे. मात्र स्वबळावर लढण्याबाबत कुठेही चर्चा झाली नसून तिन्ही पक्षांना एकत्रित लढण्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा महविकास आघाडीचेच सरकार येणार असा ठाम विश्वास काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यावेळी व्यक्त केला.
त्यानंतर केडीएमसीला केंद्राकडून आर्थिक मदत आली नाही…
पुंडलिक म्हात्रे महापौर असताना केंद्र सरकारकडून कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 1 हजार 500 कोटींचा निधी आला होता. मात्र त्यानंतर केंद्रात आणि राज्यामध्ये भाजप – शिवसेनेचे सरकार असताना त्यांनी किती निधी दिला. कल्याण डोंबिवलीतील सिमेंट काँक्रीटचे रस्ते, ड्रेनेज सिस्टीम ही कामे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलेल्या 1 हजार 500 कोटींच्या निधीतून झाली आहेत.
कल्याण लोकसभेत आणखी चांगला उमेदवार पाहिजे होता…
लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये आम्ही दुसऱ्याच्या लग्नामध्ये लाडू वाटायचे काम केल्याचा टोला लगावत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आणखी चांगला उमेदवार दिला पाहिजे होता. वैशाली दरेकर यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. तरीही आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी मनापासून काम केल्यानेच डॉ. श्रीकांत शिंदे यांचा लीड कमी होऊ शकला असेही पोटे यांनी यावेळी व्यक्त.
काँग्रेस पक्षाने आपल्याला इतके दिले मग का सोडू?…
आपल्या वाईट काळात काँग्रेस पक्षाने आपल्याला साथ दिली, ओळख दिली. मग पक्षाच्या वाईट काळात आपण त्याची साथ कशी सोडणार? असे सांगतानाच गेल्या दहा वर्षांत पक्ष सोडण्यासाठी आपल्यावर खूप दबाव आला होता, आमिषे दिली जात होती. मात्र आपण आपल्या भूमिकेवर आणि विचारांवर टिकून राहिलो अशा शब्दांत सचिन पोटे यांनी आपले अनुभव कथन केले.
कल्याण पूर्व असो की पश्चिम कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार…
आजही कल्याण पश्चिमेच्या तुलनेत कल्याण पुर्वेची परिस्थिती फारशी चांगली नाहीये. यासाठी तज्ज्ञ लोकांच्या मदतीने आपण कल्याण पूर्वेच्या विकासाचा रोडमॅप तयार केला आहे. ज्यामध्ये रुग्णालय, अभ्यासिका,पायाभूत सुविधा, मनोरंजनाची साधने आदींचा समावेश असेल. आपण कल्याण पूर्वेचेच रहिवासी असल्याने कल्याण पूर्वेला नेमकं काय पाहिजे आहे याची आपल्याला जाण आहे. आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून काँग्रेस पक्ष नंबर एक बनला आहे. त्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर वाढली असून कल्याण पूर्व असो की कल्याण पश्चिम आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असा ठाम विश्वास सचिन पोटे यांनी यावेळी व्यक्त केला.