कल्याण पश्चिम शहर चांगले पण नियोजनाचा अभाव
कल्याण दि.18 मे :
आपल्याला खासदार म्हणून निवडून द्या, मला भेटण्यासाठी तुम्हाला मला अजिबात कष्ट पडणार नाहीत. कोणत्याही त्रासाशिवय मी आपल्याला भेटण्यासाठी उपलब्ध असेन असे सांगत भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी कपिल पाटील यांचे नाव न घेता उपरोधिक टोला लगावला. काँगेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली क्लबमध्ये झालेल्या सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या सभेमध्ये ते बोलत होते. (Loksabha elections – Get elected as an MP, you won’t struggle to meet me – Suresh (Baly Mama) Mhatre
हा एकप्रकारे महाराजांचा अपमान…
कल्याण पश्चिम शहर हे चांगले असून याठिकाणी नोकरी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील. मात्र इथल्या विद्यमान लोकप्रतिनिधींमध्ये इच्छाशक्ती आणि नियोजनाचा अभाव असल्याने त्याची अशी दुरावस्था झाली आहे. कोणत्याही शहराच्या प्रवेशद्वारावरून त्या शहराची प्रतिमा आणि ओळख बनत असते. मात्र कल्याण पश्चिमेत येताना आपल्याला काय दिसते तर एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला दुर्गाडी किल्ला. आणि त्याच्यासमोरच भलामोठा कचऱ्याचा डोंगर हा एकप्रकारे महाराजांचा अपमान नाहीये का? असा संतप्त सवाल सुरेश म्हात्रे यांनी यावेळी केला.
आपल्याकडे विकासाचे व्हिजन आहे…
तर आपल्याकडे विकासाचे व्हिजन आहे. कल्याण शहरामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात, शहराला लाभलेल्या विस्तिर्ण खाडीकिनाऱ्यांचा खूप सुंदर विकास होऊ शकतो असे सांगत आपण निवडून आल्यानंतर सर्वप्रथम वाडेघर डम्पिंग आणि बारावे येथील अनधिकृत एसटीपी प्लॅन्ट बंद करू असे आश्वासनही म्हात्रे यांनी यावेळी दिले.
या सभेला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि वसंत व्हॅली सोसायटीतील विविध पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.