भिवंडी दि.14 मे :
देशभरात काही महिन्यांपूर्वी झालेले भारत जोडो अभियान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडी उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या प्रचारासाठी भारत जोडोचे ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते सरसावले आहेत. भिवंडी लोकसभेतील गावागावात हे कार्यकर्ते महाविकास आघाडी उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत.(Bhiwandi Lok Sabha : Promotion of Suresh (Baby Mama) Mhatre by activists of Bharat Jodo Abhiyan)
भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे सुरेश बाळ्या मामा म्हात्रे, महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. येत्या 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार असून इथला प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. अनेक सामाजिक संस्था आपापल्या परीने या उमेदवारांसाठी आणि त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत.
राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली होती. भारत जोडो अभियान हे राष्ट्रीय पातळीवर स्थापन झालेले असून यात शंभराहून अधिक सामाजिक संघटना सामील आहेत. याच अभियानामध्ये सहभागी झालेले ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते आता महविकास आघाडी उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या प्रचार करत आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या वस्तीमध्ये जाऊन आणि ग्रामीण भागातील गावा-गावात फिरून, नाक्यावर कॉर्नर मीटिंग घेत किंवा गरीब वस्तीत मतदारांशी थेट संपर्क केला जात आहे.
राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडोयात्रेमध्ये राजकारण-बाह्य संघटना आणि सामाजिक संस्थां,सिव्हिल सोसायटीचे अनेक जण सामील झाले होते. या सर्वांनी आता हुकुमशाही आणि द्वेषाच्या राजकारणाला मात देण्याच्या भूमिकेतून महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचा संकल्प केल्याचे विशाल जाधव यांनी सांगितले. तसेच अनेक कलाकार, पत्रकार, प्राध्यापक, वकील, इंजिनियर गृहिणी आणि सर्वसामान्य नागरिक यात हिरीरीने भाग घेत आहेत. हे अभियान मोदी आणि भाजपा यांच्या संविधान आणि लोकशाही विरोधी सरकार विरूध्द इंडिया आघाडीचे समर्थन करीत असल्याचेही विशाल जाधव यांनी स्पष्ट केले.
ठाणे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रा. डॉ. नीता साने, जगदीश खैरालीया, डॉ संजय मंगला गोपाळ, वंदनाताई शिंदे, उन्मेष बागवे, मुक्ता श्रीवास्तव, सुब्रतो भट्टाचार्य, संगीता जोशी, विशाल जाधव, शुभदा चव्हाण, सूर्यकांत, रवी घुले, सबुरी, प्रभाकर, राजेंद्र चव्हाण, मिलिंद गायकवाड, उदय छत्रे, हुकुमचंद शिरसोदे आणि अजित डफळे आदी कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारत जोडो अभियानाने आपले स्वतंत्र पत्रक काढले असून गळ्यात बॅनर घालून, ठाण्यात ‘मशाल’ ह्या चिन्हाचा आणि भिवंडीत ‘तुतारी वाजविणारा माणूस’ ह्या चिन्हाचा प्रचार करत आहेत.