कल्याण डोंबिवलीमध्ये अचानक पाऊस
कल्याण डोंबिवली दि.13 मे :
कल्याण डोंबिवलीकरांची आजची दुपार काहीशी औरच ठरली. अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने वातावरणाने आपली कुस बदलली आणि कडक उन्हाळ्याचे रूपांतर अचानक ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि पावसामध्ये झालेले पाहायला मिळाले. (Sudden rainy weather in Kalyan Dombivli)
एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले असताना गर्मीचा पाराही काही केल्या कमी केल्याचे नाव घेत नाहीये. कल्याण डोंबिवलीकरांची आजची सकाळही अशीच उगवली मात्र दुसरीकडे दुपारचे 3 साडेतीन वाजेपर्यंत वातावरणाचा संपूर्ण रंगच पालटलेला पाहायला मिळाले. अगदी दोन अडीच वाजेपर्यंत उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा असे काहीसे नकोसे चित्र असताना अचानक आकाशात ढगांनी दाटी केली आणि सोसाट्याच्या वाऱ्याने त्याला साथ संगत केली. तर अधून मधून ढगांच्या गडगडाटाचे ढोलही ऐकू येऊ लागले.
हे ही कमी म्हणून की काय या निसर्गाने अंथरलेल्या रेड कार्पेटवर पुढच्या पाच मिनिटांमध्ये वरुण राजांनी हजेरी लावली. आणि मग असह्य उकाड्याने, उष्णतेने तप्त झालेल्या कल्याण डोंबिवलीतील वातावरणाचा सुर आणि नुर दोन्ही बदलून गेला.
अवघ्या काही मिनिटांमध्ये निसर्गाने आपली ताकद दाखवत क्षणात दोन ऋतूंचे दर्शन कल्याण डोंबिवलीकरांना घडवले. आणि गर्मीने होरपळून निघालेल्या, तप्त झालेल्या या वातावरणाला निसर्गाने आपल्या आल्हाददायक ओलाव्याने तृप्त केल्याचे दिसून आले.
एकीकडे अचानक आलेल्या या पाऊस आणि त्याच्या गारव्यामुळे लोकांना गर्मीतून काहीसा दिलासा मिळाला असतानाच दुसरीकडे काही ठिकाणच्या राजकीय प्रचाराला मात्र त्याचा फटका बसला. तर शहरांतील काही भागांचा वीजपुरवठाही क्षणाचा विलंब न करता बंद झाल्याचे दिसून आले.