कल्याणच्या खडकपाडा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
कल्याण दि.10 मे :
मध्यप्रदेशमधून अपहरण झालेल्या 6 महिन्यांच्या बाळाची 29 लाखांना विक्री केल्याच्या गंभीर प्रकरणाची कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अवघ्या 8 तासांत उकल करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये पोलिसांनी 53 वर्षीय शिक्षक आणि त्याचा माजी विद्यार्थी त्याची पत्नीसह आणखी तीन जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली आहे. (Kidnapping of 6-month-old baby from MP – selling: 6 arrested, including teacher-former student)
गेल्या सोमवारी म्हणजेच 6 मे रोजी मध्य प्रदेशच्या रिवा जिल्ह्याच्या सिव्हिल लाईन भागातून, फुटपाथवर झोपलेल्या फेरीवाल्याच्या जोडप्याच्या 6 महिन्यांच्या चिमुरड्याचे अपहरण झाले होते. याबाबत मध्यप्रदेश पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये या गुन्ह्यातील संशयित आरोपी कल्याणच्या शहाड परिसरात वास्तव्यास असल्याचे समोर आले. त्याद्वारे मध्यप्रदेश पोलिसांनी अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) यांच्याशी संपर्क करून या संवेदनशील गुन्ह्याची माहिती दिली. आणि त्यानुसार कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनीही गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासला सुरुवात केली.
खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, एएसआय ठोके, पवार, बुधकर, भाटकर, वायकर, राजू लोखंडे, वागळे, महिला हवालदार गायकवाड, पोलीस नाईक सुधीर पाटील यांची दोन पथके स्थापन करण्यात आली. या दोन्ही पथकांनी अतिशय कौशल्याने आणि वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 8 तासांत या संवेदनशील गुन्ह्यातील 4 पुरुष आणि दोघा महिला आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आणि 6 महिन्यांच्या गोंडस चिमुरड्याची सुखरूप सुटका केल्याची माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सर्व गुन्ह्याचा चक्रावून टाकणारा घटनाक्रम…
मध्यप्रदेशतील रिवा जिल्ह्याच्या सिव्हिल लाईन भागातून 6 – 7 मे रोजी रात्री फुटपाथवर झोपलेल्या या फेरीवाल्यांच्या 6 महिन्यांच्या चिमुरड्याचे मोटार सायकलवर आलेल्या दोघा इसमांनी अपहरण केले. त्यावेळी बाळाच्या रडण्याने आई – वडिलांना जाग आली आणि त्या दोघांनीही पाठलाग करून मोटार सायकलस्वारांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र डोळ्यांदेखत मोटार सायकलस्वार पोटच्या गोळ्याला घेऊन पळून गेले. दरम्यान या सहा महिन्यांच्या बाळाला अपहरणकर्त्यानी तिकडेच नितीन सोनी – स्वाती सोनी (खरे नाव मेहेक खान) आणि रिक्षाचालक प्रदीप कोळंबे (हे तिघेही जण शहाड येथे राहणारे) यांच्याकडे दिले. आणि मध्यप्रदेशातून इकडे परत आल्यावर या तिघांनी या बाळाला आर्वी येरुरकर आणि अमोल येरुरकर या दाम्पत्याकडे दिले. आर्वी ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगचे काम करत असून अमोल हा मुंबईतील अतिशय नामांकित रूग्णालयात अटेंडंट म्हणून काम करतो. आणि या येरूरकर दांपत्याने या सहा महिन्यांच्या चिमुरड्याची अमोलचे माजी शिक्षक असलेल्या पोलादपूर, रायगड येथील श्रीकृष्ण पाटीलला (वय 53 वर्षे) तब्बल 29 लाखांना विक्री केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाल्याचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी सांगितले. त्यापैकी सोनी पती पत्नीला आणि रिक्षाचालक कोळंबे यांना चार लाख देण्यात आले, काही खर्च झाले आणि उर्वरित 22 लाख रुपये येरुरकर दाम्पत्याला मिळाल्याचेही ते म्हणाले.
येरुरकर दाम्पत्याचे जानेवारीपासून सुरू होते प्रयत्न…
श्रीकृष्ण पाटीलला मुलबाळ नसून आणि अमोल हा रूग्णालयात कामाला असल्याने, हॉस्पिटलमधील किंवा कोणाही गरिबाचे बाळ आपल्याला आणून देण्याची इच्छा पाटील याने व्यक्त केली होती. अमोलने याबाबत त्याची पत्नी आर्वीलाही यासंदर्भात माहिती दिली होती. आणि या दोघांनी जानेवारी महिन्यांपासून बाळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू करत श्रीकृष्ण पाटीलकडून थोडे थोडे करून आतापर्यंत 29 लाख रुपये घेतले होते.
आर्वीची प्रदीप कोळंबेशी ओळख झाली आणि मग…
दरम्यान मधल्या काळात आर्वी येरुरकरची शहाड येथील रिक्षाचालक प्रदीप कोळंबेशी ओळख झाली आणि मग तिने प्रदीपला आपल्याला अशाप्रकारचे बाळ पाहिजे असल्याचे सांगितले. तर प्रदीपने ही गोष्ट त्याचे शेजारी राहणाऱ्या (मूळचे मध्यप्रदेशचे रहिवासी) आणि रेल्वेत खेळणी विकण्याचे काम करणाऱ्या नितीन आणि स्वाती सोनी उर्फ मेहेक खानला सांगितली. त्यावर नितीन सोनीने मध्य प्रदेशातील आपल्या मित्रांशी संपर्क साधून अशाप्रकारची बाळाची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावर असे बाळ उपलब्ध असल्याचे समजताच आर्वीने नितीनी, स्वाती आणि प्रदीपला वाराणसीपर्यंत विमानाने आणि पुढे रेल्वेने पाठवले. आणि या 6 महिन्यांच्या चिमुरड्याला इकडे घेऊन आले. या चिमुरड्याला येरुरकर कुटुंबियांच्या ताब्यात दिले आणि येरुरकर कुटुंबाने हे बाळ श्रीकृष्ण पाटीलकडे दिले होते. अशी माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली.
असा झाला या सर्व प्रकरणाचा उलगडा…
मध्य प्रदेशच्या सिव्हिल लाईन पोलिसांनी या अपहरणाच्या गुन्ह्यातील एका आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर या संवेदनशील प्रकरणाचा उलगडा झाला. या आरोपीने सोनी कुटुंबाचे, सोनी कुटुंबाने प्रदीप कोळंबेचे, प्रदीप कोळंबेने येरुरकर दांपत्याचे आणि येरुरकर दांपत्याकडून श्रीकृष्ण पाटील, त्याच्याकडे असलेल्या बाळाचा उलगडा झाला. या सर्व आरोपींना मध्यप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले असून या सहा महिन्यांच्या गोंडस बाळालाही त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. आता लवकरच या बाळाला त्याच्या खऱ्या आई वडीलांपर्यंत पोहचवले जाईल अशी माहितीही पोलिसांनी यावेळी दिली. या अत्यंत नाजूक, संवेदनशील आणि तितक्याच गंभीर प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावल्याबद्दल कल्याणच्या खडकपाडा पोलिसांचे विशेष कौतुक केले जात आहे.