Home ठळक बातम्या बाईक रॅलीच्या माध्यमातून कल्याणात महविकास आघाडी उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांचा...

बाईक रॅलीच्या माध्यमातून कल्याणात महविकास आघाडी उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांचा प्रचार

दिवसभर पिंजून काढणार कल्याण पश्चिम मतदारसंघ

कल्याण दि.5 मे :
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदनाला आता अवघे दोनच आठवडे शिल्लक राहिले असून राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारासाठी चांगलीच कंबर कसलेली दिसून येत आहे. त्यात आज सुट्टीचा दिवस म्हणजे रविवारचे औचित्य साधून भिवंडी लोकसभेतील महविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी कल्याण पश्चिमेत बाईक रॅली काढत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

भिवंडी लोकसभेत सध्या तरी एकीकडे महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील, दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात कल्याण पश्चिम हा सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक मतदारसंघ असल्याने या तिन्ही उमेदवारांनी त्याकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसत आहे.

त्याचाच एक भाग म्हणून आज महविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी कल्याण पश्चिमेच्या प्रमूख भागांमध्ये बाईक रॅली काढून आपल्या संडे स्पेशल प्रचाराला सुरुवात केली. येथील योगीधाम परिसरातून या रॅलीला प्रारंभ झाला असून आज दिवसभर ते कल्याण पश्चिमेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भेट देणार आहेत.

दरम्यान ही रॅली सुरू होण्यापूर्वी सुरेश म्हात्रे यांनी योगीधाम परिसरातील श्री शंकर मंदिर, साई बाबा मंदिर आणि अनुपम नगर येथील श्री गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर या बाईक रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे सचिन बासरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्यासह या सर्व पक्षांचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा