जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून कपिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
भिवंडी दि.3 मे :
भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील हे मुंबई महानगर क्षेत्रात विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या जनआशीर्वाद यात्रेला हजारो नागरिकांचा जनसागर उसळला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीने मोठ्या संख्येने आपले शक्तीप्रदर्शन केले. यावेळी सगळीकडे जय श्रीराम आणि मोदी मोदीच्या गजर केला जात होता.(Kapil Patil will win in MMR constituency with a record margin – Chief Minister Shinde and Deputy Chief Minister Fadnavis)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाचे आमदार किसन कथोरे, महेश चौघुले,संजय केळकर, निरंजन डावखरे, रमेश पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे, विश्वनाथ भोईर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दौलत दरोडा, ज्येष्ठ नेते शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमोद हिंदुराव, रिपब्लिकन पक्षाचे नेते संजय गायकवाड, कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, श्रमजीवी संघटनेचे अशोक साप्ते, माजी आमदार नरेंद्र पवार, मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, संतोष शेट्टी, सुभाष माने आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. ढोल, झांज आणि ताशांच्या गजराने वातावरण दुमदुमून गेले होते. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पक्ष, श्रमजीवी संघटना, कुणबी सेनेच्या ध्वजांबरोबर जय श्रीराम, मोदी मोदीगजर सुरू होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजारो नागरिकांना संबोधित केले. या यात्रेला मिळालेल्या प्रतिसादातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याला मिळालेली जनतेची पसंती दिसून येत आहे. आताची लोकसभा निवडणूक ही देशासाठी महत्वाची आहे. देशाचे भविष्य घडविणारी ही निवडणूक आहे. नरेंद्र मोदींनी रोटी, कपडा और मकान दिले. परंतु, आता कॉंग्रेसचे नेते तुमची अर्धी प्रॉपर्टी सरकारजमा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कॉंग्रेसचा हा प्रयत्न हाणून पाडण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
भिवंडीत झालेली ही अभूतपूर्व गर्दी पाहून एमएमआर क्षेत्रातून सर्वाधिक मतांनी कपिल पाटील निवडून येतील, याची खात्री होत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कपिल पाटील यांना मतदान करून लोकसभेत पाठवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचे इंजिन देशाला प्रगतीकडे नेणारे आहे. या इंजिनाला भिवंडीतून साथ द्यावी. तर २६ पक्षांची खिचडी असलेल्या पक्षांकडून प्रत्येक जण मीच इंजिन असल्याचे सांगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ कोटी गरीबांची प्रगती केली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
तर ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांच्यासारख्या देशभक्ताला उमेदवारी दिली. मात्र उज्वल निकमांनी देशद्रोही अजमल कसाबची बदनामी केली असा आरोप काँग्रेसकडून केला जात असल्याकडेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.
भिवंडी मेट्रोचे ८० टक्के काम पूर्ण
भिवंडी मेट्रो प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच भिवंडी शहराला मेट्रो कनेक्टिव्हीटी मिळेल. त्यातून भिवंडीकरांचा प्रवास सुकर होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.