महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे राहणार उपस्थित
डोंबिवली दि.1 मे :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने आज कल्याण लोकसभेमध्ये मनसेकडून पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आज सायंकाळी हा मेळावा होणार असून त्याला कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत.
महायुतीच्या उमेदवाराला सर्वोच्च मतांनी निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र सैनिक कामाला लागले आहेत. मनसेचे कल्याण लोकसभा निरीक्षक आणि आमदार राजू पाटील यांनी नुकत्याच पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. तर स्थानिक पातळीवरही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शहर आणि ग्रामीण विभागात टीम तयार करण्यात आल्या असून त्या माध्यमांतून महाराष्ट्र सैनिकांनी कामाला सुरुवात केली आहे.
आज असलेल्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कल्याण लोकसभेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा आमदार प्रमोद(राजू) पाटील आणि अविनाश जाधव हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी दिली आहे.