आदित्य ठाकरेंकडून पुन्हा एकदा महायुतीवर टिकास्त्र
डोंबिवली दि.30 एप्रिल :
कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर – राणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सुभाष भोईर यांची प्रमूख उपस्थिती होती.(The candidature of Vaishali Darekar-Rane of Mahavikas Aghadi in Kalyan Lok Sabha has been filed)
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीतर्फे डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौक ते वै. ह.भ. प. सावळाराम महाराज क्रिडापर्यंत रॅली काढण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात झाली. येथील इंदिरा गांधी चौकातून निघालेली ही रॅली चार रस्ता, लोकमान्य टिळक पुतळा, शेलार नाका येथून घारडा सर्कल येथे दाखल झाली. ज्यामध्ये आमदार आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड हेदेखील काही अंतरापर्यंत सहभागी झाले होते.
या मतदारसंघातून आम्ही एक सर्वसाधारण नागरिक उमेदवार म्हणून दिला आहे. महाविकास आघाडी ही जनतेच्या हिताचे बोलत आली आहे, महाराष्ट्र हिताचे बोलत राहू. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये का पाठवले ? महाराष्ट्राचा विकास दोन वर्षे रखडलेला असल्याची टिका करत त्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन आपल्याशी डिबेट करण्याचे आव्हान आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले. तर जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागते, तेव्हा हिंदू मुस्लिम असे विषय घेऊन आपल्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्र म्हणून आम्ही सगळे एकत्रित आहोत, महाराष्ट्र हिताचे आज जर आम्ही बोललो नाही तर महाराष्ट्राचे मंत्रालय सुद्धा भाजपा गुजरातला नेऊन ठेवेल अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले.