कल्याण दि.28 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीत चोरट्यांनी आता मंदिरांकडे आपला मोर्चा वळवला असून गेल्या काही आठवड्यांत विविध मंदिरांमध्ये चोरीचे प्रकार घडले आहेत. त्यात आता टिटवाळा येथील म्हस्कळ गावात असलेल्या सुप्रसिद्ध श्री शंकर महाराज मंदिराचीही भर पडली आहे. या मंदिरातील दानपेटी फोडून चोरी झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला आहे.(Thieves march towards donation boxes in temples; Now theft in Shree Shankar Maharaj temple in Mhaskal village of Titwala)
टिटवाळा येथील फळेगाव मार्गावर म्हस्कळ गावामध्ये शंकरनाथ सेवा मंडळ गोरक्षनाथ आखाडा मंडळ ट्रस्टच्या जागेमध्ये श्री शंकर महाराजांच्या मुख्य मंदिरांसह 5 मंदिरे आहेत. यापैकी श्री स्वामी समर्थांच्या मंदिरासमोरील दानपेटी गायब असल्याची माहिती 22 एप्रिल रोजी सकाळी समोर आली. त्यानंतर ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी तातडीने मंदिर परिसरात धाव घेतली. आणि मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमधील फुटेज तपासले. त्यामध्ये तीन इसम तोंडाला आणि डोक्याला रुमाल बांधून श्री स्वामी समर्थ मंदिरासमोरील दानपेटी घेऊन जात असल्याचे त्यांना आढळून आले. त्याच्या आधारे मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून पोलिसांनी तिघा अनोळखी व्यक्तींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
तर चोरीच्या या प्रकारामुळे स्थानिक ग्रामस्थांसह भक्त मंडळींनीही नाराजी व्यक्त केली असून या तिघा चोरट्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली परिसरातील विविध मंदिरांमध्ये चोरीच्या घटनांमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.