भिवंडी लोकसभेत काँग्रेसचा विरोध मावळला,शहर काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न
भिवंडी दि .27 एप्रिल :
खासदार कपिल पाटील भिवंडी लोकसभेत मागील दहा वर्षापासून हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याची घणाघाती टिका महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी केली आहे. भिवंडीत आयोजित काँगेस मेळाव्यात बोलताना त्यांनी महायुती उमेदवार कपिल पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.(Kapil Patil’s behavior has been dictatorial for ten years – Suresh (Balya Mama) Mhatre’s scathing criticism)
भिवंडी हा काँग्रेसचा गड होता,आहे आणि राहणार…
कपिल पाटील यांनी गेल्या दहा वर्षात कोणतीही विकासकामे केली नाहीत, फक्त टक्केवारीचे राजकारण केले. त्यामुळे या निवडणुकीत पाटील यांचा पराभव केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाहीत असे आव्हानही बाळ्या मामा यांनी दिले. तर निवडणुकीच्या दिवशी सर्व नागरिकांनी अधिकाधीक संख्येनं मतदान करण्याची सादही त्यांनी उपस्थितांना घातली. तसेच देशात एक परिवर्तनाची लाट तयार झालेली आहे. म्हणूनच त्या लाटेत आम्ही सर्वजण सहभागी होणार आहोत आणि भिवंडी हा काँग्रेसचा गड होता, आहे आणि हा महाविकास आघाडीचा गड आबाधित राहिल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अखेर बाळ्या मामांना होणारा भिवंडीतील काँग्रेसचा विरोध मावळला…
उमेदवारी जाहीर झाल्यापासून सुरेश म्हात्रे यांना भिवंडी काँग्रेसकडून तीव्र विरोधाला सामोरे जावे लागत होते. मात्र अखेर भिवंडी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात बाळ्या मामा यांना यश आल्याचे दिसून येत आहे. त्यामूळेच काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना आपला पाठींबा जाहीर केला. काँग्रेसच्या भिवंडी शहर मध्यवर्ती कार्यालयात बाळ्या मामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसतर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला काँग्रेसचे माजी आमदार आणि शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन, रिजवान बुबेरे यांच्यासह प्रदेश कार्यकारणी सदस्य राकेश पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक कार्यकर्ते महिला नागरिक तसेच युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बाळ्या मामा यांच्या विजयासाठी जोमाने काम करा – काँग्रेस शहराध्यक्ष…
ही निवडणूक केवळ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व इतर कुठल्या एका पक्षाची निवडणूक नसून ही इंडिया व महाविकास आघाडीची निवडणूक असून ही देश हिताची निवडणूक असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी ही निवडणूक असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आप आपसातील मतभेद झुगारून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्या मामा यांना निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी जोमाने काम करा असे आवाहन यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.