Home ठळक बातम्या कल्याणच्या स्वागतयात्रेत घुमला जयघोष हिंदुत्वाचा आणि दिसून आला प्रचंड जल्लोष कल्याणकरांचा

कल्याणच्या स्वागतयात्रेत घुमला जयघोष हिंदुत्वाचा आणि दिसून आला प्रचंड जल्लोष कल्याणकरांचा

रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत हजारो नागरिकांचा सहभाग

कल्याणात प्रथमच निघाल्या तीन शोभायात्रा

कल्याण दि.9 एप्रिल :
गुढीपाडव्यानिमित्त कल्याणात यंदा न भूतो अशी हिंदू नववर्ष स्वागतयात्रा निघालेली पाहायला मिळाली. यावेळी इंडीयन मेडीकल असोसिएशन कडे यंदाच्या रौप्य महोत्सवी नववर्ष स्वागतयात्रेचे यजमानपद आले होते. त्यांनी कल्याणातील मराठी बांधवांसह गुजराथी, जैन, पंजाबी, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय समाजालाही या स्वागतयात्रेमध्ये सहभागी करून घेतल्याने त्याला सर्वसमावेशक असे स्वरूप प्राप्त झाले होते. तर यावेळी मुख्य स्वागतयात्रेसोबत आणखी दोन भव्य शोभायात्राही कल्याण पश्चिमेत निघाल्याने कल्याणच्या काना कोपऱ्यात हिंदुत्वाचा जयघोष आणि कल्याणकरांचा जल्लोष दिसून आला. जागोजागी काढण्यात आलेल्या भव्य रांगोळ्या आणि विविध सामाजिक संस्थांकडून या स्वागत यात्रेचे पुष्पवृष्टीत स्वागत केले जात होते.

मुरबाड रोड येथून निघाली मुख्य स्वागतयात्रा…
कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड परिसरातून कल्याणच्या या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. ज्यामध्ये ढोल ताशा पथक, महिलांचे लेझीम पथक यासोबतच टाळ मृदुंगाच्या निनादात जय श्रीरामचा गजर पाहायला मिळाला. तर या शोभायात्रेत कल्याण डोंबिवली महपालिकेतर्फे मतदान जनजागृतीपर , विद्युत विभागातर्फे सौर ऊर्जा जनजागृतीपर चित्ररथासह पर्यावरण संरक्षण, अवयवदान, आरोग्य आदी जनजागृतीपर चित्ररथ सहभागी झाले होते. रामबाग, सहजानंद चौक, छ्त्रपती शिवाजी महाराज चौक, देवी अहिल्याबाई होळकर चौक, टिळक चौक, पारनाका, लालचौकी मार्गे फडके मैदानात पोहोचली.

खडकपाडा – आधारवाडी परिसरातूनही निघाल्या शोभायात्रा…
कल्याण पश्चिमेत यंदा मुरबाड रोड येथील मुख्य स्वागत यात्रेसोबतच खडकपाडा साईचौक आणि उंबर्डे, आधारवाडी येथूनही दोन भव्य शोभायात्रा निघाल्या होत्या. उंबर्डे येथून कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने निघालेल्या शोभायात्रेत मोठ्या संख्येने आगरी कोळी समाजबांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. खडकपाडा साई चौकातून निघालेली ही शोभायात्रा आणि उंबर्डे येथून निघालेली शोभायात्रा या दोन्ही स्वागतयात्रा वासुदेव बळवंत फडके मैदानात मुख्य स्वागतयात्रेत जोडल्या गेल्या. त्यावेळी फडके मैदानात अक्षरशः भगवी लाट निर्माण झाल्याचे दिसून आले. याठिकाणी उभारण्यात आलेल्या 25 फुटी महागुढीला 125 ढोल आणि 40 ताशांच्या माध्यमातून अप्रतिम असे अभिवादन करून ही भव्य स्वागतयात्रा विसर्जित करण्यात आली.

यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, स्वागतयात्रा समिती समन्वयक डॉ. प्रशांत पाटील, भिवंडी लोकसभेतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, डॉ. अश्विन कक्कर, डॉ.राजेश राजू, डॉ. अमित बोटकुंडले, डॉ. शुभांगी चिटणीस, संस्कृती मंचचे ॲड. निशिकांत बुधकर, केडीएमसीचे संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, ॲड. जयदीप हजारे यांच्यासह कल्याणातील हजारो मान्यवर मंडळी उपस्थित होती.


तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा