कल्याण दि.6 एप्रिल :
कल्याणच्या पत्रीपुल परिसरात सुरू असणारे रस्त्याचे काम वाहन चालक आणि नागरिकांसाठी चांगलेच डोकेदुखी ठरत आहे. आज संध्याकाळपासून पुन्हा एकदा या परिसरात प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाली आहे. तर काही वाहने गेल्या दोन तासांपासून खोळंबली असल्याची माहिती वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी दिली आहे.
कल्याणच्या पत्रीपुल परिसरात पुलाच्या जोडरस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे. मात्र सुरुवातीपासून या कामाचे नियोजन बोंबलले असून त्याचा या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. त्याबाबत काही दिवसांपूर्वी प्रसिध्दी माध्यमांनी ही समस्या मांडल्यावर संबंधित प्रशासनाने याठिकाणी पाहणी करून कामाचे नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. मात्र शासकीय अधिकाऱ्यांच्या या पाहणीचा कोणताही परिणाम इथली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी झालेला दिसत नाहीये.
आज संध्याकाळी साधारणपणे सहा वाजल्यापासून पत्रीपुलाच्या दोन्ही बाजूला प्रचंड ट्रॅफिक जाम झाले आहे. गोविंदवाडी बायपाससह पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्याचे दिसत आहे. तर काही जण गेल्या दोन तासांपासून या वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. विशेषतः रुग्णवाहिकाना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला असून रुग्णांच्या जीवाची जबाबदारी प्रशासन घेणार का? असा संतप्त सवाल रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.
दरम्यान पत्रीपुलाप्रमाणेच वालधुनी पुल परिसरातही मोठी वाहतूक कोंडी झाल्याने कल्याणची प्रवेशद्वारं पुन्हा एकदा डोकेदुखी ठरू लागली आहेत.