कल्याण दि.3 एप्रिल :
कल्याणमध्ये यंदाच्या गुढीपाडवा हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामूळे ही स्वागतयात्रा ‘न भूतो’ अशी करण्यासाठी आयोजक इंडीयन मेडीकल असोसिएशन, सामाजिक संस्था आणि प्रतिष्ठीत नागरिकांनी प्रचंड मेहनत घेत आहेत. तर कल्याणातील प्रमूख ढोल ताशा पथकांकडून या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले जाणार आहे.
कल्याणची यंदाची स्वागतयात्रा यापूर्वीच्या स्वागत यात्रेपेक्षा अधिक भव्य आणि सर्वसमावेशक करण्यासाठी इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण, कल्याण संस्कृती मंच आणि सर्वच सामाजिक संस्थानी पुढाकार घेतला आहे. परिणामी यंदाची ही स्वागतयात्रा मोठ्या जल्लोषात निघणार असून त्याच्या अनोख्या मानवंदनेसाठी कल्याणातील संस्कृती, शिवदुर्ग , वेदमंत्र आणि पाचजन्य ढोल ताशा पथके एकत्र आली आहेत. या चार पथकांकडून गुढीपाडव्याच्या दिवशी ९ एप्रिलला सकाळी १०.३० वाजता वासुदेव बळवंत फडके मैदान येथे एकत्रितरित्या १२५ ढोल आणि ४० ताशांचे एकत्रित वादन केले जाणार आहेत. याकरता सारंग केळकर आणि ॲड. जयदीप हजारे यांनी पुढाकार घेत या अनोख्या मानवंदनेचे नियोजन करण्यात आले आहे. कल्याणात अशाप्रकारे पहिल्यांदाच हा सांस्कृतिक उपक्रम होणार असून त्यामुळे कल्याणमधील ढोल पथकाचा निनाद संपूर्ण महाराष्ट्रात घुमणार असल्याची प्रतिक्रिया स्वागतयात्राचे समन्वयक डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.