मोदी सरकारच्या कामांची दिली माहिती
कल्याण दि.23जानेवारी :
येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामूळे विद्यमान खासदार आणि त्यांचे प्रतिस्पर्धी या दोघांनीही आपापल्या परीने प्रचाराला सुरुवात केली आहे. या पार्श्वभुमीवर भिवंडी लोकसभेचे खासदार आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नुकतीच कल्याण पश्चिमेतील मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. ज्यामध्ये नामांकित डॉक्टर, शिल्पकार, सामाजिक संस्था आणि महिला सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. (Meeting of dignitaries in Kalyan West by Union Minister of State Kapil Patil)
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून कोणत्याही क्षणी निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. या पार्श्वभूमीवर विद्यमान खासदारांनी प्रचाराच्या दृष्टीने कंबर कसली असून अनौपचारिकपणे त्याची सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय मेळावे आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीगाठी असे उपक्रम राबविले जात आहेत.
कपिल पाटील यांनी साधला डॉ. रोठे यांच्याशी संवाद…
याचाच एक भाग म्हणून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणातील नामांकित रेडिओलॉजीस्ट आणि इंडीयन मेडीकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. संदेश रोठे यांची त्यांच्या स्टार सिटी अँड एम आर आय सेंटरमध्ये भेट घेतली. यावेळी कपिल पाटील यांनी डॉ. रोठे यांच्याशी संवाद साधत नरेंद्र मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच राष्ट्रनितीच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांनी जगभरात देशाचा नावलौकिक वाढवला आहे. आणि नरेंद्र मोदी यांना पर्याय नसल्याचे मत आपण ज्यांची ज्यांची भेट घेतली त्या सर्वांनी व्यक्त केल्याचेही कपिल पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
येत्या निवडणूकीत आधीपेक्षा जास्त मते मिळणार …
तर कल्याण पश्चिमेला राहणारा मतदार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या विकासाला प्राधान्य देणारा आहे. काही लोकं भाजपवर जाती धर्माचे राजकरण करत असल्याचा आरोप करतात. मात्र देशात केवळ युवा, गरीब, महिला आणि शेतकरी हे चार धर्म असून मोदी हे त्यांच्या विकासासाठी काम करत आहेत. आणि येत्या निवडणूकीत आपल्याला आधीच्या निवडणुकींपेक्षा जास्त मते मिळतील असा विश्वासही कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी स्टार सिटीचे प्रमुख डॉ. संदेश रोठे, भाजपाचे शहराध्यक्ष वरुण पाटील, रेणू ठाकूर आदी मान्यवर उपस्थिती होते.