2 हजारांहून अधिक स्पर्धक झाले सहभागी
कल्याण दि.18 फेब्रुवारी :
रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे आयोजित ठाणे जिल्ह्यातील पहिल्या पूर्ण मॅरेथॉन (४२ किलोमीटर) ला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या पूर्ण मॅरेथॉनमध्ये सुमारे २ हजार २०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेत ही मॅरेथॉन यशस्वी केली. तर देशभरातून आलेले दिव्यांग बांधव अर्थातच व्हीलचेअर रनर या मॅरेथॉनचे विशेष आकर्षण ठरले.
रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे गेल्या 3 वर्षांपासून अर्ध मॅरेथॉनचे आयोजन केले जात असून त्याला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभुमीवर आयोजित या पूर्ण मॅरेथॉनमध्ये सुमारे अडीच हजार स्पर्धक सहभागी झाले होते. कल्याण पश्चिमेच्या गांधारी पुल परिसरातील न्यू रिंगरोडपासून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. तर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आधी 42 किमीची पूर्ण मॅरेथॉन, त्यानंतर 21 किलोमीटर, मग 10, 5 आणि नंतर 3 किलोमीटरच्या मॅरेथॉनने या स्पर्धेचा समारोप झाला.
तर व्हील चेअरवर बसून तब्बल 5 किलोमीटर धावलेल्या दिव्यांग बांधवांच्या मॅरेथॉनला उपस्थितांची मने जिंकली. या दिव्यांग बांधवांनी आपल्यातील जिद्द, चिकाटी आणि उमेदीचे दर्शन घडवत इतरांसाठी एक आदर्श निर्माण केला.
रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात – पाय विनामूल्य बसवून देतात. तसेच चेकडॅम बांधणे, शाळा दत्तक घेणे, व्हिलचेअरचे मोफत वाटप, स्किल डेव्हलपमेंट आणि इतरही विविध सामाजिक उपक्रम रोटरीच्या माध्यमातून राबवले जातात. या सामाजिक उपक्रमांच्या निधी संकलनासाठी दरवर्षी ही मॅरेथॉन आयोजित केली जाते. आणि नामांकित व्यक्तींसह अनेक धावपटू या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन कायम आमच्या पाठीशी उभे राहत असल्याची भावना रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे विद्यमान अध्यक्ष रो. कैलास देशपांडे यांनी व्यक्त केली.
मॅरेथॉन प्रकल्प प्रमुख रो. दिपक चौधरी यांनी ही मॅरेथॉन यशस्वी करण्यात हातभार लावणाऱ्या सर्व प्रायोजक, संस्था, सहकार्य करणाऱ्या कडोंमपा आणि पोलीस अधिकारी यांचे आभार मानले. तसेच ही मॅरेथॉन लोकांपर्यत पोचवण्याचं काम करणाऱ्या पत्रकार बंधू भगिनांचेही आभार मानले.