कल्याण दि.20 जानेवारी :
देशाच्या अध्यात्मिक आणि धार्मिक इतिहासातील सुवर्ण क्षण असलेल्या प्रभु श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असून देशभरात सर्वत्र जय्यत तयारी केली जाते आहे. या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक कल्याण नगरीत रामभक्तांसमोर प्रभू श्रीरामांची 6 फुटांची भव्य मूर्ती साकारण्यात येणार आहे. कल्याणातील मनोवी ग्रुप, कुंभारवाडा मित्र मंडळ आणि रायसी रामजी राठोड कुटुंबियांच्या संयुक्त विद्यमाने 21 जानेवारीला हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी सर्वत्रच मोठा उत्साह दिसून येत आहे. कोणी दिपोत्सव करणार आहे तर कोणी सामूहिक आरती पठण. ज्याने त्याने आपापल्या परीने प्रभू श्रीरामांच्या आगमनाची जोरदार तयारी केली आहे. मात्र मनोवी ग्रुप, कुंभार वाडा मित्र मंडळ आणि रायसी रामजी राठोड कुटुंबियांतर्फे आयोजित केलेला हा काहीसा अनोखा स्वागत सोहळा असून कल्याणात प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम होत असल्याची माहिती मनोवी ग्रुपचे संचालक विमल ठक्कर यांनी दिली.
अशी साकारण्यात येणार श्रीरामाची मूर्ती…
कल्याण पश्चिमेतील कुंभार वाडा येथे 21 जानेवारी रोजी संध्याकाळी कुंभार वाड्यातील विविध मूर्तिकार ही सहा फुटांची मूर्ती साकारणार आहेत. यासाठी शाडूच्या मातीचा वापर केला जाणार असून साधारणपणे सहा तासांत ही प्रभू श्रीरामांची मूर्ती साकारण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे ठक्कर यांनी सांगितले.
तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 जानेवारीला प्रभू श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी भक्तांना दर्शन पूजा आणि महाआरती केली जाणार आहे. त्यामुळे कल्याणात पहिल्यादांच होणाऱ्या या अनोख्या सोहळ्याद्वारे प्रभू श्रीरामांना वंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.