उद्घाटनाच्या दिवशी भव्य रिंगण सोहळा ठरणार आकर्षण, राज्यातील अनेक मोठमोठ्या किर्तनकारांचे होणार किर्तन, २ ते ९ जानेवारी कालावधीत उत्सवाचे आयोजन
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उत्सव नियोजनाचा घेतला आढावा
कल्याण दि.28 डिसेंबर :
महाराष्ट्राला अनेक मोठमोठ्या साधू-संतांची मोठी परंपरा आणि इतिहास असून त्यांनी फडकवलेली ही भागवत धर्माची पताका आजही डौलाने फडकत आहे. भागवत धर्माचा समाजप्रबोधनाचा हा समृद्ध वारसा नव्या पिढीसमोर नेण्याच्या उद्देशाने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी मंडळांच्या विद्यमाने मलंगगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २ ते ९ जानेवारी दरम्यान श्री मलंगगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या उसाटणे गावात हा सोहळा संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत. खासदार डॉ.शिंदे यांनी किर्तन सोहळ्याच्या तयारीचा नुकताच आढावा घेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित सहकार्य करावे. त्याचबरोबर या उत्सवाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, पार्किंग, आरोग्य व्यवस्था, गर्दीचे विभाजन यांसारख्या गोष्टींचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी सर्वांना केले.
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने भव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन सोहळे होत असतात. असाच एक भव्य दिव्य सोहळा कोकण प्रांतातही व्हावा अशी ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी मंडळांची इच्छा होती. त्यासाठी वसुधैव कुटुंबकम अध्यात्मपीठाचे आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री आणि पालेगाव येथील तुकाई ज्ञानपीठाचे ह.भ. प.विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी पुढाकार घेत ठाणे – रायगड जिल्ह्यातील भागवतधर्म संप्रदाय प्रसारक मंडळ आणि वारकरी मंडळांच्या मदतीने भव्य अशा या किर्तन सोहळ्याचं आयोजन केले आहे. तर ह.भ.प. गणपत चांगो देशेकर या सोहळ्याचे कार्याध्यक्ष आहेत.
भव्य दिंडी आणि रिंगण सोहळा ठरणार आकर्षण...
या किर्तन सोहळ्याच्या निमित्ताने उद्घाटनाच्या दिवशी २ जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता श्री मलंगगडाच्या पायथ्यापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य अशी दिंडी काढली जाणार आहे. ज्यामध्ये अनेक ढोल ताशा वादक, लेझीम पथक, शेकडो वारकरी, अनेक कीर्तनकार यांच्यासह डोक्यावर कलश आणि तुळस घेतलेल्या तब्बल ११ हजार महिला वारकरी सहभागी होणार आहेत. तसेच भव्य रिंगण सोहळा हे या दिंडीचे मुख्य आकर्षण असेल. पंढरपूरच्या वारीमध्ये ज्यापद्धतीने होतो अगदी त्याचप्रकारे इथेही रिंगण सोहळा होणार असून त्यामध्ये पंढरपूर वारीतील ज्ञानेश्वर महाराजांचे अश्व आणण्यात येणार असल्याची माहिती ह.भ. प.विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित…
कोकण प्रांतात पहिल्यांदाच होणाऱ्या या भव्य किर्तन सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. तसेच या किर्तन सोहळ्यासाठी लागणारे आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकारांची किर्तने…
या किर्तन सोहळ्यामध्ये ह.भ.प.जगदीश महाराज जोशी, ह.भ.प. भास्करगिरी महाराज, ह.भ.प.संजयनाना धोंडगे, ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख, ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर, ह.भ.प. योगिराज महाराज गोसावी, ह.भ.प.जगन्नाथ महाराज पाटील, ह.भ.प.महादेव महाराज राऊत, ह.भ.प.अमृताश्रम स्वामी महाराज आदी नामवंत कीर्तनकार येणार आहेत. त्यासोबतच यावेळी होणाऱ्या ज्ञानेश्वरी पारायणात तब्बल ५ हजार तरुण सहभागी होणार असून ८ जानेवारीला सहस्रावधी दिव्यांच्या माध्यमातून दीपोत्सवही केला जाणार आहे. या किर्तन सोहळ्यासाठी दररोज तब्बल २५ हजारांहून अधिक भाविक उपस्थित राहणार असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे २४ तास विनामूल्य आरोग्य सेवा, रुग्णवाहिका सेवा आणि वाहन सेवाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
किर्तन सोहळ्यातून सर्वांनाच पुढे जाण्याची दिशा मिळणार – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील हजारो वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये कोणताही पक्ष नाही, संस्था नाही, आम्ही सर्व मिळून हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करत आहोत. मोठ्या प्रमाणात वारकरी मंडळ आणि दररोज २५ हजार नागरिक या सप्ताहाला उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात हरिनाम सप्ताह कधी झाला नव्हता, तो या सप्ताहाच्या रूपाने होतोय. या निमित्ताने एक भव्य दिव्य कार्यक्रम लोकांना अनुभवायला मिळेल. मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. या किर्तन सोहळ्यातून आपल्या सर्वांना नक्कीच पुढे जाण्याची दिशा मिळणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.