कल्याण दि.14 डिसेंबर :
विजेचा अनावश्यक वापर टाळणे ही आपली जबाबदारी आहे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी केले. महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत १४ ते २१ डिसेंबर दरम्यान साजऱ्या केल्या जाणा-या ऊर्जा संवर्धन सप्ताहाच्या शुभारंभाच्या त्या बोलत होत्या.
प्रामुख्याने विजेचा वापर कमी करून सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून नागरिकांनी देखील त्याला प्रतिसाद देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत बनविण्यात आलेल्या ऊर्जा संवर्धन जनजागृतीपर फलकांचे अनावरण आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे इतर अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. तर विद्युत विभागातील दिव्यांग कर्मचारी संदेश मोरे आणि वायरमन पंकज पुंड यांनी आपल्या सूमधुर आवाजात स्वरचित ऊर्जा संवर्धन गीताचे गायन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी केले. तसेच १४ ते २१ डिसेंबर याकालावधीत ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे औचित्य साधून ठिकठिकाणी जनजागृती करणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.