Home ठळक बातम्या महत्त्वाकांक्षी वीजप्रकल्प ; मनोऱ्याची उंची वाढवण्याच्या निर्णयामुळे 1 हजार 691 झाडांना जीवदान

महत्त्वाकांक्षी वीजप्रकल्प ; मनोऱ्याची उंची वाढवण्याच्या निर्णयामुळे 1 हजार 691 झाडांना जीवदान

 

कल्याण दि.6 डिसेंबर :
सरकारी पायाभूत सुविधांचा विकास हा नेहमीच निसर्गाच्या मुळावर उठत असल्याची ओरड केली जाते. परंतू या नकारात्मक प्रतिमेला छेद देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाअंतर्गत झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत मनोरे उभारण्याचे काम करताना वन विभाग आणि संबंधित कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे तब्बल 1 हजार 691 झाडांना जीवदान मिळाले आहे.

मुंबई आणि एमएमआर परिसराला अखंड वीज पुरवठ्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग ट्रान्समिशन प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजवणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत जुन्या झालेल्या वीज वाहिन्यांच्या जागी नव्या आणि अधिक क्षमतेच्या नव्या वीज वाहिन्यांचे जाळे उभारले जात आहे. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत या प्रकल्पाचा सतत आढावा घेत आहेत. त्यामुळे पडघा ते नवी मुंबई दरम्यान अतिशय वेगाने हा प्रकल्प अस्तित्त्वात येत असून सध्या कल्याण तालुक्यातील विविध गावांमध्ये त्याचे काम सुरू आहे.

कल्याण तालुक्यातील ज्या गावांमधून या प्रकल्पाचे वीज वाहिन्यांचे मनोरे उभे राहणार आहेत. तो बराचसा भाग वन विभागाच्या अखत्यारीत येत आहे. या वीज प्रकल्पाचे महत्त्व आणि भविष्यातील गरज पाहता हे मनोरे उभे करण्यासाठी नाईलाजास्तव झाडं तोडावी लागणार आहेत. कल्याण तालुक्यातील पोई गावाच्या वनक्षेत्रातील 4491 झाडे तोडण्याची रितसर परवानगी जानेवारी 2023 मध्येच मुंबई ऊर्जा मार्ग ट्रान्समिशन प्रकल्पाला प्राप्त झाली आहे. मात्र वनविभागासह संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या दूरदर्शीपणामुळे यापैकी 1691 झाडांना तुटण्यापसून वाचवण्यात येणार आहे. हे वीज मनोरे उभारण्याच्या आराखड्यात विशेष बदल करून त्यांची उंची वाढवण्यात येणार आहे. परिणामी 4491 ऐवजी 2 हजार 800 झाडेच तुटणार असल्याची माहिती मुंबई ऊर्जा मार्ग ट्रान्समिशन प्रकल्पातर्फे देण्यात आली.

वनखात्यातर्फे स्थानिकांना दरवर्षी 10 हजार झाडे दिली जाणार – आर.एन. चन्ने, वन परिक्षेत्र अधिकारी , कल्याण

संबंधित वीज प्रकल्पासाठी झाडं तोडण्याची शासकीय परवानगी 23 जानेवारी 2023 रोजी देण्यात आली आहे. त्यातही वीज टॉवरच्या मध्यल्या भागातील पूर्ण झाड तोडण्याऐवजी केवळ बाधित होणाऱ्या फांद्यांच तोडण्यात येणार आहेत. ज्यामुळे एक ते दीड हजार झाडं तुटण्यापासून वाचतील अशी माहिती कल्याणचे वन परिक्षेत्र अधिकारी चन्ने यांनी दिली आहे. तसेच ही झाडं तोडण्याचे काम स्थानिक कंत्राटदारांनाच दिले जाणार आहे. तर तोडण्यात आलेल्या या वृक्षसंपदेच्या माध्यामातून मिळणारे अर्धे उत्पन्न हे पोई गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला दिले जाईल असेही चन्ने यांनी यावेळी सांगितले. तसेच स्थानिकांना दरवर्षी विविध प्रजातींची सुमारे दहा हजार झाडेही दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या सर्वांचा विचार करता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये विकास आणि निसर्ग यांची सांगड घालण्याचा चांगला प्रयत्न करण्यात आल्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला असून इतर प्रकल्पातही याचे अनुकरण करण्याची गरज व्यक्त होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा