वेतन मिळेपर्यंत काम न करण्याचा निर्णय
कल्याण डोंबिवली दि.11 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवलीतील कंत्राटी सफाई कामगारांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. केडीएमसी प्रशासनाने लेखी आश्वासन देऊनही वेळेत वेतन न मिळाल्याचा निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. कल्याण डोंबिवलीतील सुमारे 1 हजाराच्या आसपास कंत्राटी कामगारांनी आजपासून सामूहिक सुट्टी टाकली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कल्याण डोंबिवलीत कचरा प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. (No wages on time: Collective holiday agitation by sweepers in Kalyan Dombivli)
कल्याण डोंबिवलीत खासगी कंत्राटदारांमार्फत शहरातील कचरा उचलण्याचे काम केले जाते. मात्र या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळत नसल्याच्या मुद्द्यावर मनसेने काही दिवसांपूर्वीच केडीएमसी प्रशासनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी दर महिन्याच्या 10 तारखेला या कर्मचाऱ्यांना वेतन मिळेल असे लेखी आश्वासन केडीएमसी घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिल्याची माहिती मनसे कामगार सेनेच्या उल्हास भोईर यांनी दिली.
तसेच या कर्मचाऱ्यांचे गेल्या 2-3 महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. गेल्या महिन्यात गणेशोत्सव झाल्यानंतर या कामगारांना वेतन देण्यात आले होते. तर ऑक्टोबर महिन्यापासून प्रत्येक 10 तारखेला वेतन दिले जाईल असे लेखी देऊनही आज 11 तारीख आली तरी अद्याप वेतन मिळाली नसल्याची माहिती उल्हास भोईर यांनी दिली आहे. केडीएमसी उपायुक्त अतुल पाटील यांच्या या वागणुकीविरोधात कर्मचाऱ्यांनी सामूहिक सुट्टी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही तोपर्यंत हे सामूहिक सुट्टी आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचेही भोईर यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळल्यास ऐन सणासुदीच्या दिवसांत कल्याण डोंबिवलीत कचऱ्याची समस्या अधिक बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.द
रम्यान याबाबत उपायुक्त अतुल पाटील यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा कॉल सतत बिझी येत असल्याने संपर्क होऊ शकला नाही.