Home ठळक बातम्या कल्याणात दहीहंडी उत्सवाच्या परवानगीवरून शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने

कल्याणात दहीहंडी उत्सवाच्या परवानगीवरून शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने

 

कल्याण दि.31 ऑगस्ट :
दहीहंडी उत्सवाला अद्याप एक आठवडा शिल्लक असतानाच कल्याणात या उत्सवाच्या परवानगीवरुन काला सुरू झाला आहे. कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दहीहंडी उत्सव साजरा करण्यावरुन शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने आले आहेत.

कल्याण शहरातील एक मानाची दहीहंडी म्हणून छ्त्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेनेच्या दहीहंडी उत्सवाची ख्याती आहे. या दहीहंडी उत्सवाने नेहमीच एक सकारात्मक आणि सामाजिक संदेश दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यंदाच्या दहीहंडी उत्सवाच्या परवानगीसाठी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अशा दोन्ही गटांनी पोलिसांकडे अर्ज केले होते. त्यावर पोलिसांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला या दहीहंडी उत्सवासाठी परवानगी दिली आहे. त्यावरून उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन बासरे यांनी सांगितले की ‘शहरप्रमुख या नात्याने आपण या उत्सवासाठी परवानगी मागितली. मात्र पोलीस राजकीय दबावाला बळी पडल्याचा आरोप करत सण उत्सवांमध्ये देखील राजकारण आणले जात असल्याचे सचिन बासरे यांनी सांगितले. राजकीय दबावापोटी शिंदे गटाला परवानगी देण्यात आली असून लवकरच याबाबत पक्षाकडून भूमिका जाहीर केली जाईल असे सचिन बासरी यांनी स्पष्ट केले आहे.

तर शिवसेनेतर्फे गेल्या पंधरा वर्षापासून हा दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. आम्ही कोणावरही दबाव आणून परवानगी मागितली नसल्याचे सांगत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी बासरे यांचे आरोप फेटाळून लावले.
तसेच हा उत्सव धार्मिक असून यात आम्ही कोणत्याही प्रकारचे राजकारण केले नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान दहीहंडी उत्सवाच्या परवानगीवरून सुरू झालेला हा काला इकडेच शमतो की या वादाचेही दहीहंडीच्या गोविंदाप्रमाणे थर लागतात हे लवकरच स्पष्ट होईल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा