उल्हासनगर दि.२८ ऑगस्ट :
महावितरणच्या उल्हासनगर एक उपविभागात येणाऱ्या बारमध्ये सुरू असणारी तब्बल 18 लाखांची वीज चोरी महावितरणच्या पथकाने उघड केली आहे. विशेष म्हणजे जवळपास 3 वर्षांपासून (३४ महिन्यांपासून) ही वीजचोरी सुरू असल्याची माहिती महावितरण तर्फे देण्यात आली. (Electricity theft of 18 lakhs revealed by bar operator of Ulhasnagar; Strike action of the Mahavitaran team)
उल्हासनगर एकमधील पोलिस चौकीजवळच्या शॉप क्रमांक ५७५ येथे हा अशोका बार आहे. महावितरणच्या पथकाने या बारच्या वीज पुरवठ्याची तपासणी केली असता वीज मीटरचा ‘बी’ फेज चेंज करून त्याद्वारे चोरुन वीज वापरण्याची यंत्रणा बसवण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच हे वीजमीटर दिवंगत व्यक्तीच्या नावावर असून बारचालकाने गेल्या ३४ महिन्यात तब्बल ९१ हजार ६७७ युनिट विजेचा चोरटा वापर केल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
दरम्यान चोरीच्या विजेचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याबाबत बारचालकाला नोटिस बजावण्यात आली आहे. विहीत मुदतीत या रकमांचा भरणा न झाल्यास वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये बार चालकावर वीजचोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी फिर्याद देण्यात येणार असल्याचेही महावितरणतर्फे सांगण्यात आले.
ही कारवाई कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनजंय औंढेकर आणि कल्याण दोन मंडलचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर एकचे कार्यकारी अभियंता सतीश कुलकर्णी, उपकार्यकारी अभियंता सुनिल पावरा, सहायक अभियंता जयेश बेंढारी, तुषार सातकर, वरिष्ठ तंत्रज्ञ महेंद्र रोठे, वसंत पाडवी, मनोज राठोड, विद्युत सहायक प्रितीलाल पांडव यांच्या पथकाकडून करण्यात आली.