कल्याण डोंबिवलीतील खड्डे भरण्याच्या कामाची पाहणी
कल्याण डोंबिवली दि.२० जुलै :
कल्याण डोंबिवलीत यंदाही शहरांतील रस्ते खड्डेमय झाले असून एखादी दुर्घटना घडल्यास संबंधित अभियंता आणि कंत्राटदाराला जबाबदार धरले जाणार आहे. केडीएमसीचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी आज कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची पुन्हा एकदा पाहणी केली. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
खड्ड्यांमुळे दुर्घटना घडली तर हे जबाबदार…
गेल्या काही वर्षांत कल्याण डोंबिवलीत खड्ड्यांमुळे काही जणांना जीव गमवावा लागला आहे. तर खड्ड्यांमुळे पडून अनेक नागरिक जायबंदीही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर केडीएमसी शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी एक पत्रक काढून अशा दुर्घटनांची जबाबदारी निश्चित केली आहे. शहरांतील रस्त्यांवर अनेक कारणांमुळे दुर्घटना घडू शकतात. मात्र खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाल्यास पालक म्हणून महापालिकेची अर्थातच संबंधित अभियंता किंवा कंत्राटदारांची असेल अशी प्रतिक्रिया शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी व्यक्त केली आहे.
रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने भरण्याचे निर्देश…
गेल्या दोन तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील रत्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. ते भरण्याचे काम सुरू असून पावसामुळे काहीशी अडचण येत असली तरीही हे काम अव्याहतपणे सुरू आहे. तर क्विक सेटिंग सिमेंटच्या माध्यमातून हे खड्डे भरण्याच्या सूचना शहर अभियंता अहिरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. तर काही रस्त्यावर पाणी जाण्यासाठी असणारे व्हीपहोल साफ झाले नसल्याने खड्डे पडत असल्याचे दिसून आले. खड्डे भरण्याचे काम रात्री करण्याच्या, संबंधित अभियंत्याने दररोज रस्त्यांवर फिरून पाहणी करण्याच्या, केडीएमसीच्या ताब्यातील नसणाऱ्या रस्त्यांवरील खड्डेही भरून त्याची देयके शासनाच्या संबंधित विभागाला पाठविण्याच्या महत्वपूर्ण सूचनाही अर्जुन अहिरे यांनी यावेळी केडीएमसी अधिकाऱ्यांना केल्या.
शहर अभियंत्यांनी यावेळी दुर्गाडी किल्ला परिसर, पत्रीपुल गोविंदवाडी, उंबर्डे, सहजानंद चौक, म्हसोबा चौक ठाकुर्ली, डोंबिवली पूर्व स्टेशन परिसर, लोकमान्य टिळक चौक आदी प्रमूख ठिकाणाच्या रस्त्यांची आणि खड्डे भरण्याच्या कामाची पाहणी केली.