यासंदर्भात ट्विट करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
कल्याण ग्रामीण दि.१९ जुलै :
मुसळधार पावसाने आज दिवसभरात ठाणे जिल्ह्यासह मुंबई परिसराला अक्षरशः झोडपून काढले. अतिवृष्टीचा देण्यात आलेला इशारा आणि आज दुपारनंतर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता पुढील २-३ दिवस सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. आमदार पाटील यांनी यासंदर्भात एक ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे ही मागणी केली आहे.
मुंबई ठाण्यासह संपूर्ण एम एम आर परिसराला आज मुसळधार पावसामुळे अतोनात हाल झाले आहेत. त्यातच हवामान खात्याने पुढील तीन दिवस अशाच प्रकारे अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी सर्व ऑफिसेस आणि कंपन्यांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा द्यावी असे निर्देश सरकारने देण्याची मागणी केली आहे. वर्क फ्रॉम होम झाल्यास नागरिकांना मनस्ताप होणार नाही तसेच संभाव्य दुर्घटनाही कळू शकतील असेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे. त्यावर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पहावे लागेल.