जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता लगावला टोला
कल्याण दि.16 जुलै :
ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्ष आता दहशतवादमुक्त झाल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता लगावला. कल्याणात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय उलथा पालथीदरम्यान अजित पवार यांनीही आपल्या भाषणात थेट नामोल्लेख टाळत जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिकास्त्र सोडले होते. मात्र अजित पवार यांचे सर्वात विश्वासू सहकारी अशी ओळख असणाऱ्या प्रमोद हिंदुराव यांनी आज एक पाऊल पुढे टाकत जितेंद्र आव्हाड यांचा समाचार घेतल्याचे दिसून आले. आता ठाण्याचा त्रास कमी झाला असून यापुढे कल्याण हेच मुख्य ठाणे असेल अशा शब्दांत त्यांनी आगामी कल्याणच्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली.
जितेंद्र आव्हाड यांचा त्रास होता का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता हिंदुराव म्हणाले की कुणामुळे कोण सोडून गेले याच्यापेक्षा आमच्यामुळे कोण जोडले जात असेल तर तो जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं टाकण्यापेक्षा आम्ही आता सक्षम आहोत, आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. जे आमच्यासोबत येतील त्यांना आमच्यासोबत पुढे नेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे प्रमोद हिंदुराव यांनी यावेळी स्पष्ट केले.
तर ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आता दहशतवादमुक्त झाली आहे. आधी लोक त्याठिकाणी जायला घाबरत होते, आता हिंमत करतायत, तेही सगळे येतील त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण सुचल्याशिवाय राहणार नाही. येत्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कल्याणातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण बैठक घेणार असल्याचं सांगितलं.
दरम्यान येत्या काळात पक्ष बांधणीसाठी अजित पवार हे लवकरच कल्याणच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.