विजेतेपदावर सलग दुसऱ्यांदा कोरले नाव
कल्याण दि.१० जुलै :
पुण्यामध्ये झालेल्या तिसऱ्या “सह्याद्री ऑफरोड चॅलेंज” स्पर्धेमध्ये कल्याणकर तरुणांनी बाजी मारली. या चारचाकी (4×4) स्पर्धेच्या विजेतेपदावर सलग दुसऱ्यांदा नाव कोरत कल्याणच्या युवकांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. (The youth of Kalyan won the tough ‘Sahyadri Offroad Challenge’ competition)
राज्यभरातून अनेक स्पर्धक सहभागी…
पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक बाईक आणि स्पोर्ट्स कार चालकांना अतिशय अवघड अशा ऑफरोड स्पर्धांचे वेध लागतात. राज्याच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या आणि ऑफरोड ड्रायव्हींगची आवड असणाऱ्या चालकांना एकत्र करणे हा या सह्याद्री ऑफरोड चॅलेंज स्पर्धेमागचा आयोजकांचा उद्देश. त्यातूनच मग गेल्या ३ वर्षांपासून या अत्यंत अवघड तसेच चालकाच्या कौशल्य आणि संयमाची परीक्षा घेणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. आधीच्या दोन स्पर्धांप्रमाणे याही स्पर्धेला राज्यभरातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. ज्यामध्ये कल्याणच्या अनिरुद्ध शेटे आणि त्याचा सहकारी चालक आकाश मलबारी यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे सलग दुसऱ्यांदा अनिरुद्धने ही स्पर्धा जिंकत आपला दबदबा निर्माण केला आहे. तर पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून त्यांना आयोजकांतर्फे गाडीचे महागडे चार टायर देण्यात आले.
इतकी कठीण असते ही स्पर्धा…
तर आपल्या नेहमीच्या वापरातील जीप किंवा तत्सम चारचाकी गाड्या (4×4) या स्पर्धेसाठी विशेष पद्धतीने मॉडीफाय केल्या जातात. ज्यातून त्यांची कार्यक्षमता (engine power) वाढविण्यासह या अवघड अशा स्पर्धेसाठी त्यांना तयार केले जाते. कारण ज्या ट्रॅकवर ही स्पर्धा खेळवली जाते तो काही साधासुधा सरळमार्गी ट्रॅक नसतो. कधी चिखलाचा खड्डा तर कधी थेट टेकडीवरील अवघड चढण अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत चालकाला गाडी चालवावी लागते. एकप्रकारे या स्पर्धेमध्ये गाडीसोबत चालकाच्या वाहन कौशल्याचाही चांगलाच कस लागतो.
अशा प्रकारची ही महाराष्ट्रामधील एकमेव गाडी…
दरम्यान अशा अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण स्पर्धेचे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा मिळवल्याबद्दल कल्याणकर अनिरुद्ध शेटे आणि त्याचा सहकारी चालक आकाश मलबारीचे विशेष कौतूक केले जात आहे. अनिरुद्धच्या या (4×4) गाडीचे वैशिष्ट्य असे आहे की नॉर्मल गाडीला फक्त पुढे स्टेरिंग असते. मात्र ह्या गाडीला मागेसुद्धा स्टेरिंग असल्याने पुढचे टायर जसे वळतात अगदी तसेच मागचे टायरही वळतात. अशा प्रकारची ही महाराष्ट्रामधील एकमेव गाडी असल्याचे अनिरुद्ध शेटे यांनी सांगितले.