कल्याण डोंबिवली दि.२ जुलै :
महापालिकेच्या कार्यलयीन कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासह जनतेच्या तक्रारींवर लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी केडीएमसीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक आठवड्याच्या दर सोमवारी जनता दरबार घेतला जाणार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यासंदर्भात एक परिपत्रक काढले आहे. ज्यामध्ये महापालिकेच्या परिमंडळ 1 आणि 2 च्या उपायुक्तांनी त्यांच्या अधिपत्याखालील मध्यवर्ती प्रभागक्षेत्र कार्यालयात “जनता दरबार” आयोजित करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिले आहेत.
प्रत्येक सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत हा जनता दरबार…
नागरिकांच्या तक्रारी समजून घेऊन दूर करुन घेणे, विविध कल्याणकारी योजनांची माहिती स्थानिक स्तरावर देण्यासोबत तक्रारी, निवेदनांचा निपटारा विशिष्ट कालावधीत होणे आवश्यक आहे. यासाठी आठवडयाच्या प्रत्येक सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत हा जनता दरबार घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले आहे.
याठिकाणी होणार हे जनता दरबार…
हे जनता दरबार कल्याणमध्ये ब प्रभागक्षेत्र कार्यालयात तर डोंबिवलीमध्ये डोंबिवली रेल्वे स्थानकानजीक असणाऱ्या महानगरपालिकेच्या जुन्या विभागीय कार्यालयात होणार असल्याचे केडीएमसीकडून सांगण्यात आले.
नागरिकांच्या सर्व तक्रारी घेणे बंधनकारक…
तर या जनता दरबारात कर्मचारी सेवाविषयक आणि नागरिकांच्या सर्व तक्रारी घेणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे संबंधित परिमंडळातील सर्व संबंधित सहाय्यक आयुक्त, इतर तांत्रिक अधिकारी आणि कर्मचारी यांनीही यावेळी उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे.
15 दिवसांमध्ये तक्रारींचे निराकरण आवश्यक…
संबंधित विभागीय उपायुक्त यांच्याकडे तक्रारी/समस्या प्राप्त झाल्यावर 15 दिवसांमध्ये त्याचे निराकरण करुन नागरिक/कर्मचारी यांना उत्तर देण्याचे निर्देशही आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत.