केडीएमसी आणि पोलीस प्रशासन धृतराष्ट्राच्या भूमिकेत ?
कल्याण दि.१२ जून, एलएनएन न्यूज नेटवर्क :
कल्याण…मध्य रेल्वेवरील सर्वात महत्त्वाच्या आणि जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक स्टेशन. ज्याला आर्थिक राजधानी मुंबईचे रेल्वे मार्गावरील प्रवेशद्वार असेही म्हटले जाते. एवढे सगळे महत्त्वाचे कांगोरे असूनही इथल्या शासकीय यंत्रणांना मात्र बहुधा त्याच्याशी काहीही देणे घेणे नाही. म्हणूनच दर वर्षागणिक कल्याण स्टेशन परिसर अधिकाधिक बकाल आणि गलिच्छ झाला आहे. तर धृतराष्ट्राच्या भूमिकेत असणाऱ्या केडीएमसी आणि पोलीस प्रशासनाचे डोळे कधी उघडणार..? कल्याण स्टेशन परिसराचे कधी होणार कल्याण..? असे संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
नावात काय असतं ? असं आपण नेहमीच मस्करीमध्ये बोलत असतो. परंतू बऱ्याचदा नावामध्येच भरपूर काही असतं आणि विरोधाभास तर असतोच असतो हे आपल्याला या शहराच्या नावावरून नक्कीच जाणवेल. आपल्या शहराच्या केवळ नावातच कल्याण आणि बाकी इतर सामाजिक सोयी सुविधेच्या नावाने मात्र बोंबाबोंब. कल्याण स्टेशनबाहेर पाऊल ठेवल्याठेवल्या पावलोपावली ही गोष्ट अधोरेखित होते.
बाहेर आल्यावर सर्वात प्रथम दर्शन होते ते अतिशय शिस्तबद्ध, प्रवाशांविषयी मनामध्ये आस्था आणि आपुलकी असणाऱ्या रिक्षाचालकांचे. त्यांची सर्वात मोठी शिस्त म्हणजे रिक्षा अतिशय व्यवस्थित, कोणालाही त्रास न होता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रवाशांना जाण्या येण्यासाठी भरपूर मोकळी जागा ठेवून उभी करण्याची. याबाबतीत तर त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही. सर्व नियम आणि कायद्यांचे इतके काटेकोरपणे पालन होते की त्याच्यामुळे स्टेशन परिसरातील वाहतूक पोलिसांना वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडावा.
बरं रिक्षाचालकांच्या या प्रेमळ आणि आल्हाददायक स्वागतानंतर त्यांच्यापुढे असणारे अनधिकृत फेरीवाले प्रवाशांसाठी जणू काही रेड कार्पेट अंथरून बसलेले असतात. अख्ख्या जगात त्यांच्यासारखी परिणामकारक डीटीएच (डायरेक्ट टू हॅण्ड ) सेवा आणि सुविधा देणारी बाजार व्यवस्था शोधून सापडणार नाही. आणि विशेष म्हणजे या जागतिक दर्जाच्या बाजार यंत्रणेला, आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन प्रोत्साहन आणि पाठबळ देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचे तर करावे तितके कौतुक कमीच पडेल. नेमून दिलेल्या आपल्या जबाबदारी आणि कामाप्रती इतकी तळमळता असणारे असे अधिकारी आणि कर्मचारी लाभणे म्हणजे या शहराचे नशीबच.
असे शिस्तबद्ध रिक्षाचालक, रेड कार्पेट टाकून बसलेल्या जागतिक दर्जाच्या अनधिकृत फेरीवाल्यानंतर मग स्टेशन परीसरात आपल्या स्वागताला सज्ज असतात ते गर्दुल्ले, तृतीयपंथी आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वारांगना. यांच्या महतीबद्दल काय बोलणार..? आपण कितीही बोललो, कितीही लिहिले तरी ते कमीच. म्हणूनच मग अनेकदा त्यांच्याकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या वर्ल्ड क्लास हॉस्पिटीलिटीला तर तोडच नाही. त्यांची ही समाजसेवा बघून तर पोलीस प्रशासनाचेही डोळे आपसूकच पाण्याने भरून येतात.
अशा सर्व जागतिक दर्जाच्या सेवा – सुविधा आपल्याला कल्याण स्टेशन परिसरात एकाच छताखाली आणि त्याही मोफत मिळत असतील तर मग आता आणखी काय हवंय तुम्हाला? जगाच्या कोणत्याही प्रगतीशील देशामध्ये तुम्हाला इतक्या उच्च दर्जाच्या सुविधा तुम्हाला शोधूनही सापडणार नाहीत.
आणि बरं यापेक्षा आणखी चांगलं काही तुम्हाला देण्यासाठी तुम्ही आहात तरी कोण…? तर एक सर्वसामान्य नागरिक. समाजातील एक असा घटक की ज्याच्याबद्दल निवडणुका येईपर्यंत राजकारण्यांना आणि मोठी दुर्घटना घडेपर्यंत सरकारी यंत्रणेला कोणतेही सोयर सूतक नसते. ज्याच्या नावाच्या पुढे जरी ‘ सर्व ‘ असेल परंतू त्याला मिळत मात्र काहीच नाही.