मुंबई महापालिकेतील कारभारावरून ओढले शाब्दिक आसूड
कल्याण दि. ११ मे :
मुंबई महापालिकेतील कारभारावरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काव्यात्मक शब्द रचनेतून नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. खासदार डॉ. शिंदे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर त्याबाबतची एक पोस्ट करत शाब्दिक आसूड ओढलेले पाहायला मिळत आहेत.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, मिठी नदीचा गाळ, कचरा, डिजीटल शिक्षण, कोविड आदी मुद्द्यांवरून आदित्य ठाकरे यांना नाव न घेता लक्ष्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असताना त्याच्या पूर्वसंध्येला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेली ही काव्यात्मक टीकेची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
अशी आहे खासदार डॉ. शिंदे यांची पोस्ट…
भ्रष्टाचाराचे बाळकडू प्यायले
रस्त्यावरचे डांबर गेले
कचऱ्याचे डोंगर फस्त केले
मिठीच्या गाळाचे पेले रिचावले
डिजिटल शिक्षणातून दही मटकावले
कोवीड मृतांच्या टाळूवरचे लोणीही नाही सोडले
तरीही युवराज, किती ही पोटदुखी?
भ्रष्टाचार करूनी उभा जन्म गेला
तरी भूक नाही संपली
बेसुमार लुटमार करून माती खाल्ली
अन मती आता गुंग झाली…
अशा काव्यात्मक शब्दांतून खासदार डॉ. शिंदे यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावर टिका केली आहे.