मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते १० कोटींचे बक्षीस प्रदान
कल्याण डोंबिवली दि.२० एप्रिल :
कल्याण डोंबिवली महापालिकेने केलेल्या शहर सौंदर्यकरणाच्या प्रयत्नांची अखेर राज्य शासनाने दखल घेतली आहे. नगर विकास दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धेत केडीएमसीला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दहा कोटी रुपयांचा धनादेश केडीएमसी प्रशासनाला प्रदान करण्यात आला. (Transformation efforts succeed: Kalyan Dombivli ranks second in city beautification competition)
मुंबईत झालेल्या शानदार सोहळ्यात केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे, सचिव संजय जाधव आदींनी हा पुरस्कार स्वीकारला.
केडीएमसीच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद…
गेल्या वर्षभरापासून या राज्यस्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने गेल्या वर्षभरापासून कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने कंबर कसली होती. शहरातील विविध सामाजिक संघटना संस्था शाळा महाविद्यालय यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना यासाठी साद घालण्यात आली. आणि या सर्वांनी कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता के डी एम सी च्या या हाकेला सकारात्मक आणि परिणामकारक प्रतिसाद दिला विविध संस्थांनी आपली जबाबदारी वाटून घेत त्या दृष्टीने कामाला सुरुवात केली.
म्हणून मिळाला दुसरा क्रमांक…
मग ते वॉलपेंटिंग असो डिव्हायडर रंगवणे असो, डिव्हायडरचे सुशोभीकरण असो, रस्त्यांची सफाई असो सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता असो की आकर्षक पद्धतीने केलेली विद्युत रोषणाई. शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अशा विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या या नामांकित संस्था आणि व्यक्तींनी अत्यंत चोखपणे बजावल्या. ज्यामुळे राज्य शासनाला त्याची दखल घ्यावीच लागली. आणि परिणाम स्वरूप राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेला दुसरा क्रमांक प्राप्त झाला.
लोकसहभागाला शासन मान्यतेची मोहर…
या स्पर्धेमध्ये या राज्यस्तरीय शहर सौंदर्यकरण स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवली महापालिका सुरुवातीपासूनच काहीशी उजवी ठरली. इतर महापालिका मग मुंबई असो की नवी मुंबई महापालिका आदींकडून स्वखर्चाने हे शहर सौंदर्यकरण केले केले गेले. तर केडीएमसी प्रशासनाने एक रुपयाही खर्चा न करता लोकसहभागाच्या माध्यमातून शहर सौंदर्यीकरणाचे सर्व उपक्रम राबवले. ज्यामुळे राज्य सरकारनेही या लोकसहभागाची दखल घेत त्यावर आपली पसंतीची मोहोर उमटवली.
शहरांसोबत इथल्या नागरिकांच्या मानसिकतेचाही कायापालट…
कल्याण डोंबिवली महापालिकेबाबत बोलायचे झाल्यास कोविड येण्यापूर्वीची महापालिका आणि आत्ताची महापालिका यामध्ये जमीन असमानता फरक जाणवत आहे. त्याचे श्रेय द्यावे लागेल ते डॉक्टर सूर्यवंशी यांना. कायापालट अभियान ही डॉक्टर विजय सूर्यवंशी यांची संकल्पना. हे अभियान शहरात राबवण्यापूर्वी त्यांनी केडीएमसी प्रशासनात राबवत अधिकाऱ्यांच्या नकारात्मकतेचा सकारात्मक मानसिकतेमध्ये कायापालट केला. आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवलीत या महत्वपूर्ण अभियानाला सुरुवात झाली. तर केडीएमसीचे विद्यमान आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनीही हे कायापालट अभियान कायम ठेवत त्याची व्याप्ती आणखी वाढवली.
नागरिकांच्या नकारात्मक विचार आणि मानसिकतेचाही कायापालट…
कोवीडनंतर केवळ केडीएमसी प्रशासन आणि या शहरांचाच कायापालट होत नाहीये. तर या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या नकारात्मक विचार आणि मानसिकतेचाही कायापालट झाल्याचे आज दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मिळालेले वेगवेगळे पुरस्कार हे त्याचेच द्योतक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परंतू ही तर केवळ सुरुवात समजून या पुरस्कारांनी केडीएमसी प्रशासनाने अजिबात हुरळून जाऊ नये. यापेक्षा आणखी चांगले काम करण्याची मोठी संधी केडीएमसी प्रशासनाला असून आता त्यांनी ही घोडदौड कायम राखण्याची गरज आहे.
या पुरस्कारासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, शहर अभियंता अर्जुन अहिरे, महापालिका सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्यासह क्रेडाई एमसीएचआय, इंडियन मेडिकल असोसिएशन, पर्यावरण दक्षता मंडळ, सोलस इंडिया ऑनलाईन, सहयोग सामाजिक संस्था, निर्मल युथ फाऊंडेशन, श्रीमती चंदामाता सेवा संस्था, ऊर्जा फाऊडेशन आदी संस्थांसह रुग्णालये, शिक्षण संस्था नागरिकांनी मोलाचा वाटा उचलला.