मात्र उद्यापासून तापमानात घट होण्याचा अंदाज
कल्याण डोंबिवली दि.१९ एप्रिल :
कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर जणू काही सूर्यनारायणाचा प्रकोप सुरू आहे. त्यामुळेच आज सलग दुसऱ्या दिवशी याठिकाणी ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. रोजच्या या वाढत्या तापमानाचा लोकांच्या डोक्याला ताप झाला असला तरी उद्यापासून तापमानात घट होणार असल्याचा दिलासादायक अंदाज हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी वर्तवला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटे सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी तापमानाच्या पाऱ्याने थेट ४२ अंश सेल्सिअसचा आकडा ओलांडल्याने यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक उच्चांकी तापमानाची नोंद झाली. आजही ठाणे आणि रायगड भागात कालच्यासारखीच परिस्थीती जाणवत आहे. या भागावर सुरू नारायण जणू आग ओकत असल्याचा भयानक अनुभव इथल्या लोकांना येतोय. गेल्या दोन दिवसांपासून इतकी भीषण गर्मी जाणवत आहे की लोकांना दुपारच्या वेळेला बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.
तर ठाणे जिल्ह्यात आजही बऱ्याच्यशा शहरांत कालच्याप्रमाणेच ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले. त्यातही मुरबाड आणि कर्जत या दोन ठिकाणी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी तापमान नोंद झाली. मुरबाडमध्ये पाऱ्याने थेट ४४.२ अंश सेल्सिअस आणि कर्जतमध्ये तर तब्बल ४५.३ अंश सेल्सिअस इतक्या भयानक तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी एल एन एन शी बोलताना दिली. हे दोन दिवसांतील तापमानाचे आकडे आणि बाहेर असलेली प्रचंड गर्मी पाहूनच भोवळ येत आहे.
मात्र त्यातही दिलासादायक बाब म्हणजे उद्यापासून या भयानक गर्मीतून सुटका होण्याची शक्यता आहे. उद्यापासून इथल्या तपमानात क्रमिक घट पाहायला मिळेल. २१ एप्रिलपासून इथले तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आतमध्ये राहील असा अंदाजही अभिजित मोडक यांनी वर्तवला आहे.
आजचे कमाल तापमान
मुंबई ३८.८° सेल्सियस
कल्याण ४२.७
डोंबिवली ४२.६
विरार ४०
मीरा रोड ४०.१
नवी मुंबई ४१.९
ठाणे ४२
मुंब्रा ४२.१
पनवेल ४२.३
बदलापूर ४२.५
कासारवडवली ४२.७
धसई ४३.२
मुरबाड ४४.२
कर्जत ४५.३