कल्याण ग्रामीण दि.27 मार्च :
राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये अंबरनाथ तालुक्यातील वैष्णवी पाटील उपविजेती ठरली. वैष्णवीच्या या उत्तुंग भरारीबद्दल मनसे आमदार राजू पाटील यांनी चांदीची गदा भेट देत सन्मान केला.
सांगलीमध्ये ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. ज्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ गावातील कुस्तीपटू वैष्णवी दिलीप पाटीलने अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्तीपटुंचे त्याकडे लक्ष लागले होते. मात्र वैष्णवीला या स्पर्धेत उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. वैष्णवीवर आता सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत असून मनसे आमदार राजू पाटील यांनीही
वैष्णवीला मानाचा फेटा बांधून चांदीची गदा भेट देत कौतुकाची थाप दिली.
वैष्णवीने राज्याच्या पहिल्या महिला कुस्ती स्पर्धेत धडक देत ठाणे जिल्ह्यासह श्रीमलंगगड भागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याची प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील, अंबरनाथ मनसे तालुका अध्यक्ष नकुल पावशे, तालुका सचिव अंबाजी भाग्यवंत यांच्यासह ग्रामस्थ आणि वैष्णवीचे प्रशिक्षकही उपस्थित होते.