अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला मुद्दा
कल्याण दि. २४ मार्च :
ठाणे आणि रायगड जिल्ह्याप्रमाणे कल्याण पश्चिम विधानसभा मतदासंघात मोठ्या प्रमाणावर आगरी – कोळी तसेच वारकरी समुदायाचे वास्तव्य आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीकडून आगरी कोळी आणि वारकरी भवनसाठी भूखंड आरक्षित करण्यासह ठराव मंजूर होऊनही अद्याप त्याची अंमलबजाणी झालेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने हे दोन्ही भवन उभारण्यासाठी केडीएमसीला निर्देशित करण्याची मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. मुंबईत सुरू असणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते.
ठाणे आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने आगरी कोळी समाजाची वस्ती आहे. त्याचप्रमाणे कल्याण पश्चिम विधानसभा मतदरसंघामध्येही सुमारे १ लाखांच्या आसपास आगरी कोळी बांधवांचे वास्तव्य आहे. आगरी कोळी समाजातर्फे दरवर्षी आगरी कोळी महोत्सव, सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. मात्र आगरी कोळी समाजासाठी कोणतीही इमारत किंवा भवन नाहीये. या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेला महापालिकेकडून ठराव मंजूर झालेल्या आरक्षित भूखंडावर अद्ययावत आगरी कोळी भवन उभारण्याची मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे.
त्यासोबतच कल्याण पश्चिम विधानसभा मतदासंघात वारकरी समाजही मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. वै. ह.भ.प. सावळाराम महाराज आणि शंकर महाराज यांचे हजारो अनुयायी या भागात आहेत. त्यामूळे महापालिकेतर्फे वारकरी भवनसाठीही भुखंड आरक्षित केला असून अद्याप याठिकाणी वारकरी भवन उभारण्याचे काम झालेले नाही. आगरी कोळी भवनाप्रमाणे अद्ययावत वारकरी भवन उभारण्याची मागणीही आमदार भोईर यांनी केली आहे.