केडीएमसी उपक्रमांनी पटकावला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार
कल्याण दि.28 फेब्रुवारी :
कोवीड काळापासून कात टाकू लागलेल्या केडीएमसी प्रशासनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. वाचन प्रेरणा दिनानिमित्त केडीएमसीकडून राबवलेल्या उपक्रमांची दखल घेत राज्य शासनाकडून केडीएमसीचा गौरव करण्यात आला आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या सादरीकरणासाठी महाराष्ट्र शासनाचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार केडीएमसी प्रशासनाला प्रदान करण्यात आला.
राज्य शासनाकडून महानगरपालिका स्तरावर स्पर्धेचे आयोजन…
वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित स्पर्धेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सहभाग घेतला होता. थोर शास्त्रज्ञ आणि देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेबाबत आपुलकी वाढीस लागण्याच्या उद्देशाने राज्य शासनाकडून महानगरपालिका स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
केडीएमसीकदून सामाजिक उपक्रम आणि स्पर्धा…
या पार्श्वभूमीवर केडीएमसीचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, महापालिका सचिव तसेच माहिती जनसंपर्क विभागप्रमुख संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये महापालिका अधिकारी – कर्मचाऱ्यांसह शहरांतील नागरिक आणि विद्यार्थीही सहभागी झाले होते. गद्यवाचन , चर्चासत्र, घोषवाक्य, स्वरचित काव्यवाचन सादरीकरण, चारोळी स्वरचित, बोलीभाषा, एकपात्री अभिनय (मराठी भाषेत), माय मराठी ॲपचा प्रचार यांसह शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी निबंध, वाक्प्रचार, सुविचार आदी स्पर्धा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आणि केडीएमसी प्रशासनाने राज्य सरकारचे लक्ष वेधले…
त्यासोबतच कल्याणातील वाचनप्रेमी विशाल कदम कुटुंबीयांचा कुटुंब रंगलाय वाचनात हा बहारदार कार्यक्रम आयोजित करत केडीएमसी प्रशासनाने राज्य सरकारचे आपल्याकडे लक्ष वेधले. आणि अखेर केडीएमसी प्रशासनाने या राज्यस्तरीय स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार झाला प्रदान …
मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, विधिमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकर, मराठी भाषा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांच्या हस्ते हा पुरस्कार केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, सचिव तथा माहिती जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव, माहिती जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे व्यवस्थापक दत्तात्रय लदवा तो यांच्याकडून स्विकारण्यात आला.
केडीएमसीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…
दरम्यान यापूर्वी कोव्हीड इनोव्हेशन आणि उर्जा संवर्धन हे दोन पुरस्कार केडीएमसीला प्राप्त झाले आहेत. त्या पाठोपाठ महाराष्ट्र शासनच्या मराठी भाषा विभागाचा द्वितीय पुरस्कार मिळाल्याने केडीएमसीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.