पुलाच्या कामावरून दोघांमध्ये सुरू झाले सोशल मिडिया वॉर
डोंबिवली दि.23 फेब्रुवारी :
डोंबिवलीतील माणकोली पुलाच्या कामावरून शिवसेना आणि मनसे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या पुलाच्या पूर्णतेबाबत एमएमआरडीएने केलेल्या दाव्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मग त्यावर शिवसेनेकडूनही युवासेना नेते दिपेश म्हात्रे यांनी मैदानात उतरत मनसे आमदार राजू पाटील यांना प्रत्यूत्तर दिले.
एमएमआरडीएच्या माध्यमातून मोठागाव ते माणकोली पुलाचे काम सुरू आहे. कल्याण आणि डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासह ठाण्याला जाण्या येण्याच्या वेळेतही या पुलामुळे मोठी बचत होणार आहे. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामूळे या महत्वपूर्ण पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आल्याने एमएमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन यांनी काही दिवसांपूर्वी या पुलाच्या कामाची पाहणी केली. तसेच या पुलाचे काम 84 टक्के पूर्ण झाल्याचे सांगत नागरिकाना लवकरच त्यावरून सुसाट प्रवास करता येईल असे स्पष्ट केले.
काय म्हणाले मनसे आमदार राजू पाटील…
मात्र कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी एमएमएमआरडीए आयुक्तांच्या दाव्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत या 2016 मध्ये भूमिपूजन झालेल्या या पुलाचे काम 84 टक्के झाले असून डोंबिवलीकरांचा प्रवास सुसाट होणार असल्याची बतावणी केली जात असल्याचे म्हटले. तसेच डोंबिवलीतून या पुलाकडे पोहचण्यासाठी रेल्वेवर पुल आणि रुंद रस्ते तयार करणे गरजेचे असल्याचे सांगत ते कधी होणार असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच आपली सातत्याने हीच मागणी हीच आहे की विकास प्रकल्प करताना त्याला पर्याय उपलब्ध असणे आवश्यक आहे. निवडणूक आली की लोकप्रिय घोषणा करून निवडणुकीच्या तोंडावर काम पुढे सरकावयाचे असे सांगत या अनुषंगाने आपण केलेली ती मागणी असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच आपण वस्तुस्थिती मांडली असून ज्यांना ती झोंबली त्यांना झोंबु द्या अशी प्रतिक्रया आमदार पाटील यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.
शिवसेनेच्या दिपेश म्हात्रे यांनी असे दिले प्रत्यूत्तर…
तर शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनीही मग ट्विट करत मनसे आमदार राजू पाटील यांना प्रत्यूत्तर दिले. मोठागाव ते कोपर रेल्वे स्टेशन रस्त्यासाठी वर्कऑर्डर मंजूर झाली असून रेल्वे फाटकावरील पुलालाही मान्यता मिळाल्याचे म्हात्रे यांनी नमूद केले आहे. तसेच मनसे आमदार राजू पाटील यांनी काळजी करू नये पलावा जंक्शन येथे ज्या पद्धतीने ट्रॅफिकचा बोजवारा उडालाय तशी स्थिती इकडे होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचा टोलाही दिपेश म्हात्रे यांनी या ट्विटद्वारे लगवला आहे.
दरम्यान डोंबिवलीहून ठाणे किंवा मुंबईला जाण्यासाठी हा मोठागाव पुल अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. येत्या मार्च अखेरीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे लवकरच त्याची पाहणी करणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली ते ठाणे या रस्त्याने प्रवासाचा वेळ कमी होण्यासह वाहतुकीची कोंडी फुटण्यास मोठी मदत होणार असल्याचे शिवसेना युवा सेनेचे कार्यकारणी सदस्य दीपेश मात्रे यांनी सांगितले.