(फाईल फोटो)
कल्याण दि. 7 फेब्रुवारी :
कल्याणच्या गांधारी परिसरात झालेल्या नव्या रिंग रोडवर अपघातांचे सत्र थांबण्याचे काही नाव घेत नाहीये. गेल्या आठवड्यात एका तरुणीच्या अपघाती मृत्यू झाल्यानंतर काल पुन्हा झालेल्या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावर बंदी घालण्याची आग्रही मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
कल्याण आणि डोंबिवलीतील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढत्या अपघातांमुळे हा रस्ता सुरक्षेच्या कारणास्तव प्रकाश झोतात आला आहे. या नव्या रिंगरोडवर गेल्याच आठवड्यात एका तरुणीचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याला अवघा आठवडाही उलटत नाही तोच काल एक युवक बाईक अपघातात गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
या रिंग रोडवर कुठेही स्पीड ब्रेकर नसल्याने अनेक वाहन चालक अतिशय सुस्साटपणे आपल्या गाड्या चालवताना दिसतात. आणि यातूनच मग एखाद्याचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी आवश्यक त्या सूचना आणि कायदेशीर कारवाई करूनही बेदरकारपणे वाहन चालविण्याचे प्रकार काही केल्या थांबत नाहीयेत. पोलिसांच्या कारवाईनंतरही अनेक जण याठिकाणी धूम स्टाईलने गाड्या चालवत इतरांच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत.
या वाढत्या अपघातांमुळे वाहन चालकांसोबतच याठिकाणी येणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज या रस्त्यावर शेकडो नागरिक फिरण्यासाठी येत असतात. ‘आमची काही चूक नसताना एखादे भरधाव वाहन आम्हाला येऊन धडकले आणि आमच्या जीवाचे बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण ?’ असा संतप्त सवाल हे नागरिक विचारत आहेत.
या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत या मार्गावर टू व्हीलरसह सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी घालावी. केवळ चालण्यासाठी आणि सायकलसाठी हा मार्ग खुला ठेवावा अशी आग्रही मागणी शाम वाबळे, संदीप आव्हाड, बाळासाहेब एरंडे या नागरिकांकडून करण्यात आली आहे. त्यावर आता प्रशासन काही ठोस भूमिका घेणार की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच खडबडून जागे होणार हे लवकरच स्पष्ट होईल.