दोन दिवसांचा जलप्रवास करून आली कल्याणात
कल्याण दि.6 फेब्रुवारी :
भारतीय नौदलात (Indian Navy) आपल्या पराक्रमी शौर्याद्वारे मानाचे स्थान मिळवलेली T80 ही युद्ध नौका अखेर कल्याणच्या खाडी किनारी दाखल झाली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमधून जलमार्गाने या युद्धनौकेचा कल्याणच्या दिशेने प्रवास सुरू झाला होता. ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी होणाऱ्या प्रस्तावित स्मारकासाठी ही युद्धनौका केडीएमसीकडून कल्याणात आणली गेली आहे. (Kya Baat Hai : T-80 warship docked at Kalyan Bay)
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार (नौदल) ऐतिहासिक कल्याणच्या खाडी किनारी उभे केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कर्तुत्व, दूरदृष्टी आणि पराक्रमाची साक्ष म्हणून भारतीय नौदलाच्या या निवृत्त युद्धनौकेचे स्मारक उभारले जात आहे. आपल्या नव्या पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि कल्याणचा असणारा हा सुवर्ण इतिहास माहिती होण्यासह त्यातून प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने हे स्मारक उभारले जाणार आहे.
तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या काळात मिळाली चालना…
डॉ. विजय सुर्यवंशी…कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त. ज्यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास सांगणाऱ्या या आरमार स्मारक प्रकल्पाची पायाभरणी झाली. मात्र डॉ. सुर्यवंशी यांनी स्वतः जातीने लक्ष घालत केलेल्या पाठपुराव्यामुळे अत्यंत कमी वेळेत हा प्रकल्प आकारास येत आहे. तर डॉ. सुर्यवंशी यांच्यानंतर आयुक्तपदी नियुक्त झालेल्या डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडूनही कल्याणच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्याच ताकदीने धुरा सांभाळली जात आहे.
युद्धनौकेबाबत नोव्हेंबर महिन्यात झाला करार…
भारतीय नौदलातील T 80 ही युद्धनौका कल्याणात स्मारक स्वरूपात विराजमान करण्याबाबत गेल्या नोव्हेंबर महिन्यात भारतीय नौदल आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन (SKDCL) यांच्यात करार झाला होता. त्यानूसार दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या कुलाबा येथील नौदल डॉकयार्डमधून कल्याणच्या दिशेने रवाना झाली होती. यावेळी रिअर ॲडमिरल ए. एन. प्रमोद, कमांडर जीलेट कोशी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, तत्कालीन केडीएमसी आयुक्त आणि विद्यमान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, शहर अभियंता अर्जुन अहिरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
स्मारकाच्या रूपातून मिळणार पराक्रमाची साक्ष…
ही युद्धनौका कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी स्मारक स्वरूपात विराजमान होणार आहे. त्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची ज्योत तेवत राहणार आहे. तसेच या स्मारकातून आपल्या नविन पिढ्यांसाठी हा सुवर्ण इतिहास समोर येण्यासह त्यातून नक्कीच एक प्रेरणा मिळेल यात कोणतीही शंका नाही.