पारसिक बोगद्यामुळे लोकांच्या प्रवासातील वेळेत बचत होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे दि. २८ जानेवारी :
एमएमआरडीएच्या ऐरोली काटई फ्री वे प्रकल्पांतर्गत पारसिक डोंगरातील मुंब्रा – ऐरोली बोगद्याच्या डाव्या मार्गाचे काम पूर्ण झाले असून नियंत्रित स्फोटाद्वारे हा बोगदा दोन्ही बाजूने खुला करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रकल्पातील डाव्या बाजूच्या बोगद्याच्या भुयारीकरणाचे काम आता पूर्ण झाले असून हा बोगदा दोन्ही बाजूने खुला झाला आहे. या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी यावेळी व्यक्त केला. (Another step forward for Airoli-Katai Freeway: Parsik Hill Tunnel open from both sides)
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्यासह अधिकारी, अभियंते उपस्थित होते.
डाव्या बाजूकडील बोगदा दोन्हीकडून जोडण्यात यश…
कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या ऐरोली ते काटई भुयारी मार्गातील डाव्या बाजूकडील बोगदा दोन्ही बाजूकडून जोडण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, ऐरोली, नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या रस्त्यामुळे ७ किमीने अंतर कमी होणार असून नवी मुंबई येथून डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत कमालीची बचत होणार असून इंधनाचीही बचत होणार आहे. प्रवासाचा वेळ वाचल्यामुळे नागरिकांच्या कार्यक्षमतेतही वाढ होईल.
कल्याण डोंबिवलीमध्ये या प्रकल्पांची कामेही आहेत वेगाने सुरू…
राज्य शासनाच्या वतीने अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. शिळफाटा ते कल्याण आणि कल्याण ते भिवंडी असा थेट एलिव्हेटेड उड्डाणपूल बांधणार आहोत. तसेच कल्याण ते तळोजा मेट्रो असा दुमजली रस्ता आणि मेट्रो अशा मार्गाचे नियोजन आहे. याशिवाय माणकोली -डोंबिवली या खाडी पुलाच्या कामामुळे अंतर कमी होईल. तर ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी चेंबूर फ्रिवे जेथे उतरतो त्या ठिकाणाहून थेट फाऊंटनपर्यंत शहराबाहेरुन बायपास बनवला जातोय. ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी असे अनेक प्रकल्प राबवित असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुंबईत क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी डबलडेकर टनेल…
तसेच मुंबई आणि मुंबई महानगर परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी डबलडेकर टनेल ही संकल्पना राबविणार आहोत. जेणेकरून मुंबई आणि एमएमआरमधल्या लाखो प्रवाशांची वाहतूक कोंडीमधून सुटका होउन त्यांचे जीवन सुसह्य होईल, असेही ते यावेळी म्हणाले.
ऐरोली – काटई असा आहे प्रकल्प…
ऐरोली ते कटाई नाका प्रकल्प हा तीन भागात विभागाला गेला असून भाग-१ अंतर्गत ठाणे बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ आहे. या भागाची लांबी ३.४ कि.मी. इतकी असून त्यामध्ये १.६९ कि.मी. लांबीचा दुहेरी बोगदा आणि उर्वरित रस्ता तसेच उन्नत मार्ग आहे. या प्रकल्पात असलेला बोगदा हा चार ४+४ मार्गिकेचा आहे.( त्यामध्ये १+१ रेफ्युजी मार्गिका आहे.) या बोगद्यांच्या भुयारीकरणाचे काम हे (New Austrian Tunneling Method- NATM) कंट्रोलिंग ब्लास्टिंग या तंत्रज्ञान पद्धतीने करण्यात येत आहे. सद्यस्थितीत बोगद्याचे ६७ टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाची उर्वरित कामेही प्रगतीपथावर आहेत.
कल्याण- डोंबिवली ते नवी मुंबई अंतर ७ किमीने घटणार…
सद्यःस्थितीत प्रवाशांना महापे किंवा ठाणे येथून मार्ग काढून जावे लागत आहे. या प्रकल्पामुळे कल्याण- डोंबिवली आणि नवी मुंबई मधील अंतर ७ कि.मी. ने कमी होईल. त्यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होईल. या प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
वेळेची आणि इंधनाची बचत होणार…
एमएमआरडीचे महानगर आयुक्त श्रीनिवास म्हणाले की, “पारसिक टेकड्यामधील भुयारीकरणाचे काम हे खूप अवघड आहे. आज डाव्या बाजूच्या बोगद्यात शेवटचा ब्लास्ट करून तो दोन्ही बाजूंनी खुला झाला आहे. ह्या बोगद्याच्या दुसऱ्या बाजूच्या भुयारीकरणाचे कामही लवकरच पूर्ण होईल. दोन्ही बाजूंचे काम पूर्ण झाल्यावर प्रकल्पातील महत्त्वाचा आणि अवघड टप्पा पार होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहतूक कमी होईल आणि काटई नाका ते ऐरोली दरम्यानच्या प्रवास 30 मिनिटांनी कमी होईल. ज्याचा फायदा मुंबईहून कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.