खडकपाडा पोलिसांची कारवाई
कल्याण दि.२५ जानेवारी:
कोवीड काळात भिवंडीच्या टाटा आमंत्रा क्वारंटाईन सेंटरमधून पळून गेलेल्या मोक्क्याच्या गुन्ह्यातील सराईत इराणी चोरट्याला खडकपाडा पोलिसांनी अत्यंत शिताफीने पुन्हा गजाआड केले आहे.गाझी दारा इराणी जाफरी असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात मोक्काचे ४ गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण परिमंडळ डी सी पी सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चोरीच्या विविध गुन्ह्याप्रकरणी गाझीला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. मात्र दोन वर्षापूर्वी कोवीड झाल्याने गाझीला भिवंडी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतू क्वारंटाईन सेंटर इमारतीच्या ३२ व्या मजल्यावरील बाथरूममधून तो पळाला होता. फरार झाल्यानंतरही त्याने चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती डी सी पी सचिन गुंजाळ यांनी दिली.
पोलिसांच्या डोळ्यात मारला मिरची स्प्रे…
कल्याणजवळील लहुजी नगर परिसरात गाझी लपून बसल्याची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तो येणार असणाऱ्या ठिकाणी पोलिसांचे एक पथक दबा धरून बसले होते. तो आल्यानंतर या पथकाने त्याच्यावर झडप घातली असता गाझीने त्याच्याकडे असलेला मिरची स्प्रे पोलिसांच्या डोळ्यांवर मारत इतर हत्यारांच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यानंतरही पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या. गाझीकडून आत्तापर्यंत तीन मोटरसायकलसह मिरचीचा स्प्रे ,दोन चाकू आणि एक एअरगन देखील जप्त केल्याचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी सांगितले.
म्हणून चोरट्यांनी शोधले आता नवीन साथीदार…
कल्याणजवळील आंबिवलीची इराणी वस्ती ही आपल्या गुन्हेगारी त्यातही चेन स्नॅचिंगच्या कारवायांमुळे नेहमीच पोलिसांच्या रडारवर राहिली आहे. परिणामी या वस्तीतील अनेक सराईत गुन्हेगार आज मोक्काअंतर्गत तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यामूळे आता या वस्तीतील गुन्हेगारांनी इराणी नसलेल्या बाहेरील गुन्हेगारांची मदत घेऊन गुन्हे करण्यास सुरुवात केल्याचे आतापर्यंत अटक झालेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमधून दिसून येत असल्याची महत्वाची माहितीही यावेळी डी सी पी सचिन गुंजाळ यांनी दिली. खडकपाडा पोलिसांनी जेरबंद केलेल्या या गाझीचा साथीदार जयकुमार राठोड असून राठोडला पोलिसांनी सहा महिने आधीच बेड्या ठोकल्या आहेत. गाझी विरोधात खडकपाडा, कोनगाव ,महात्मा फुले, मानपाडा, बदलापूर, भिवंडी मधील निजामपूर पोलीस ठाण्यात एकूण बारा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अप्पर पोलिसांकडून विशेष बक्षीस…
खडकपाडा पोलीस गेल्या २ वर्षापासून गाझीच्या मागावर होते. मात्र गाझी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत होता. मात्र काल गाझीला पुन्हा एकदा जेरबंद करण्यात खडकपाडा पोलिसांना अखेर यश आले. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक शरद झिने, नंदकुमार केंचे, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, हवालदार अशोक पवार, राजू लोखंडे, मनोहर भोईर, योगेश बुधकर, पोलीस नाईक सुधीर पाटील या पथकाने ही कारवाई केली. त्याबद्दल अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी खडकपाडा पोलिसांना ३५ हजारांचे विशेष बक्षीस जाहीर केले आहे.