महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार राहणार उपस्थित
डोंबिवली दि.२३ जानेवारी :
गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवत प्रथम क्रमांक पटकावला असून राज्याला क्रीडा क्षेत्रात मिळालेला हा सर्वोच्च बहुमान आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात राष्ट्रीय स्पर्धांसह आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातील खेळाडूंचा ठसा उमवण्याच्या आणि राज्यातील क्रिडा क्षेत्राची दिशा ठरवणाऱ्या चिंतन आणि मंथन बैठकीचे डोंबिवलीत आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी २६ जानेवारी रोजी डोंबिवलीतील जिमखाना येथे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेतर्फे (MOA – Maharahstra Olympic Association) ही बैठक घेतली जाणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार (ajit pawar)यांच्या प्रमूख उपस्थितीत ही बैठक संपन्न होणार असल्याची माहिती संघटनेचे महासचिव नामदेव शिरगांवकर यांनी दिली. (Maharashtra olympic association meeting)
ऑलम्पिक स्पर्धेत यश मिळवणे हे प्रत्येक खेळाडूचे लक्ष्य असले तरी क्षमता असतानाही अनेक खेळाड विविध अडचणीमुळे तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्यातील खेळ आणि खेळाडूंचा विकास करण्याचा निश्चय महाराष्ट्र ऑलम्पिक असोसीएशनने अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली केला असल्याचे शिरगावकर म्हणाले. अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत राज्याचे क्रीडा क्षेत्रातील गौरव स्थान कसे टिकवून ठेवता येईल? खेळाडूना कोणत्या सुविधाची गरज आहे ? भविष्यातील ऑलम्पिक उड्डाणासाठी क्रीडाक्षेत्राची रणनीती कशी असेल ? महाराष्ट्र राज्याचा खेळाडू देशाचे नेतृत्व कसे करू शकेल?या सारख्या महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करून शासनाला आराखडा सादर केला जाणार आहे.
या बैठकीत अर्जुन पुरस्कार विजेते अशोक पंडित, ध्यानचंद पुरस्कार विजेते प्रदीप गंधे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार पटकावणारे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील क्रीडा संघटनाच्या सदस्यांसोबत बैठक तसेच चर्चासत्र असे या कार्यक्रमाचे स्वरूप असेल. राज्यभरात खेळाच्या अनेक संघटना असून या संघटना खेळाडू घडवत असल्या तरी त्यांना अनेक समस्या असतात. या समस्या जाणून घेत त्या सोडवून या खेळाडूंना ऑलिम्पिकपर्यंत पोचवण्यासाठी ही बैठक मैलाचा दगड ठरणार असल्याचेही नामदेव शिरगावकर यांनी सांगितले.
राज्यातील पहिल्या बैठकीसाठी जिमखान्याचा पुढाकार…
डोंबिवली जिमखान्याने या राज्यातील पहिल्या वहिल्या बैठकीच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे. खेळाडूसाठी तरण तलाव, भव्य मैदान उपलब्ध करून देणाऱ्या जिमखान्याच्या वतीने आता हॉलीबॉल,अॅथलेटिक्स, शुटींग, आर्चरी,बास्केटबॉल, एनिस, तायक्वांदो,स्केटिंग, टेबल टेनिस या खेळाना देखील प्राधन्य दिले जाणार असून त्या त्या खेळाच्या संघटना आणि कोच बरोबर चर्चा करून अत्युच्च दर्जाचे कोच जिमखान्यात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जास्तीत जास्त खेळाडूनी पुढे येत या सुवर्ण संधीचा लाभ घेत स्वताबरोबरच राज्याचे देशाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी डोंबिवली जिमखाना आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसीएशनचे उद्दिष्ट असल्याचे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोससीएशनचे कार्यकारी सदस्य आणि आयोजन समिती अध्यक्ष दिपक मेजारी यांनी सांगितले.
ही बैठक यशस्वी करण्यासाठी दीपक मेजारी यांच्या समवेत टेबलटेनिसचे सेक्रेटरी यतीन टिपणीस, जिमखान्याचे सेक्रेटरी धनंजय कुडाळकर, पर्णाद मोकाशी, क्रीडा शिक्षक उदय नाईक, लक्ष्मण इंगळे, प्राचार्य घनश्याम ढोकरट, समन्वयक अविनाश ओंबासे मेहनत घेत आहेत.