जिल्हाधिकारी कार्यालयात झाला हृद्य सोहळा
ठाणे दि.11 जानेवारी :
जिल्ह्याचे मुख्यालय म्हणाजेच जिल्हाधिकारी कार्यालय म्हटले की ऐरव्ही शासकीय बैठका आणि शासनाशी संबंधितच कामकाज असेच काहीसे ढोबळ चित्र समोर येते. परंतू ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासाठी कालचा दिवस हा नेहमीच्या दिवसांपेक्षा काहीसा वेगळा नव्हे तर जणू स्पेशलच होता. त्याचे निमित्त ठरला तो आगळा वेगळा भावनिक असा अनाथ बालक दत्तक सोहळा. एकीकडे अनाथ बालकांना हक्काची मायेची ऊब मिळाली होती तर दुसरीकडे चिमुरड्यांच्या आनंदाला मुकलेक्या आई वडिलांची रीती झोळी भरली जात होती. आणि भलेही ही कायदेशीर असली तरी अत्यंत संवेदनशील प्रक्रिया पूर्ण करताना ठाणे जिल्हाधिकारीही तितकेच भावूक झाल्याचे दिसून आले.
या प्रक्रियेची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे…
ठाणे जिल्ह्यातील 16 अनाथ बालकांना काल एकाच वेळी कायदेशीररित्या पालक प्राप्त झाले. सरकारतर्फे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार अनाथ, सोडून दिलेले आणि परित्यागीत बालकांचे दत्तक आदेश तसेच नात्यांतर्गत दत्तक आणि सावत्र दत्तक घेण्यासाठी दत्तक नियमावली 2022 तयार करण्यात आली आहे. यापूर्वी न्यायालयामार्फत होणाऱ्या या प्रक्रियेची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. त्यानुसार सुनावणी करून इच्छुक पालकांकडे ही दत्तक बालकं सोपविण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी संबंधित पालकांना सुपूर्द केले. नेरुळ येथील चिल्ड्रन ऑफ द वर्ड इंडिया ट्रस्ट आणि डोंबिवलीतील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट दत्तक संस्थांनी ही अर्ज प्रक्रिया पूर्ण केली.
यावेळी जिल्हा महिला- बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव, सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी शिरसाट, नेरुळ येथील चिल्ड्रन ऑफ द वर्ड इंडिया ट्रस्ट दत्तक संस्थेच्या बेट्टी मथाई, डोंबिवलीतील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्टच्या वंदना पाटीलही यावेळी उपस्थित होते.
दत्तक घेण्यासाठी याठिकाणी करा अर्ज…
बालकल्याण समिती ठाणे यांच्या आदेशान्वये या दोन्ही संस्थांमध्ये अनाथ, सोडून दिलेल्या परित्यागीत बालकांना दाखल करण्यात येते. CARA (Central Adoption Resource Authority) CARINGs cara.nic.in या संकेतस्थळावर दत्तक इच्छुक पालक नोंदणी करून ‘कारा’ ने दाखविलेल्या मुलगा किंवा मुलीला पालकांनी राखीव केल्यानंतर दत्तक समितीद्वारे पालकांची मुलाखत घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे दत्तक आदेश देण्यासाठी अर्ज करण्यात येते.
जीवनातील एक वेगळा क्षण – जिल्हाधिकारी शिनगारे…
अनाथ, सोडून दिलेले व परित्यागित बालकांना पालक मिळणे आणि याचा आनंद त्या बालकांच्या चेहऱ्यावर पाहणे हा क्षण आगळावेगळा आहे. हे मानवतेचे काम माझ्या सहीने होत आहे, हा माझ्या जीवनातील अनोखा क्षण असल्याची भावना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी व्यक्त केली.
तीन बालके जाणार परदेशात
जिल्ह्यातील 6 महिना ते 6 वर्षाची मुले वर्षामधील 16 बालकांचे दत्तक आदेश आज जिल्हाधिकारी शिनगारे यांनी आज पारित केले. विशेष म्हणजे मुली दत्तक घेणाऱ्यांचे प्रमाण यामध्ये जात आहे. दत्तक गेलेल्यांपैकी 11 मुली आणि पाच मुलांचा समावेश आहे. आदेश दिलेल्यांमधील दोन मुली या अमेरिकेतील पालकांकडे तर एक मुलगा हा इटलीतील पालकांकडे जाणार आहे. तर महाराष्ट्रात 7, ओरिसामध्ये, त्रिपुरा, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक,
गुजरात या राज्यात प्रत्येकी एका पालकांकडे ही बालके दत्तक गेली आहेत.