डोंबिवली दि.८ जानेवारी
सांस्कृतिक डोंबिवलीत येत्या 20 जानेवारीला पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे पुस्तकाच्या आदान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या आदान प्रदान सोहळ्यात बहुभाषिक पुस्तकांचा समावेश होणार असून जवळपास नऊ दिवस डोंबिवलीतील वै. ह.भ. प. सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे पुस्तकांची पंढरी अवतरणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुस्तकांनी साकारण्यात येणार माजी राष्ट्रपतींची प्रतिकृती…
या सर्व परिसराला यंदा एपीजे अब्दुल कलाम नगरी असे नाव देण्यात येणार आहे. पुस्तकांनी त्यांची प्रतिकृती साकारण्यात येणार असून ते एक प्रमुख आकर्षण असणार आहे. त्यासोबतच पुस्तकांच्या इग्लु, पिरॅमिड आणि अन्य प्रतिकृतीही साकारण्यात येणार असल्याही माहिती पै फ्रेंड्स लायब्ररीच्या पुंडलिक पै यांनी दिली.
यांच्या प्रमूख उपस्थितीत होणार शुभारंभ…
या सोहळ्याचा शुभारंभ प्रख्यात साहित्यिक अच्युत गोडबोले, उमाताई कुलकर्णी, प्रख्यात राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, महापालिका आयुक्त मंगेश चितळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत २० जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता करण्यात येणार आहे. तसेच डोंबिवलीतील सुमारे ४० साहित्यिकांचे साहित्य यावेळी प्रदर्शनाच्या निमित्ताने बघायला मिळणार आहे.
या दिग्गज व्यक्तींची कार्यक्रमाला उपस्थिती…
तर पुस्तक अदान प्रदानाच्या या १० दिवसांत माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्राताई महाजन, महेश कोठारे, प्रणव सखदेव, अरुणा ढेरे, प्रल्हाद दादा पै, वसंत लिमये, चंद्रशेखर टिळक, रोहन चंपानेरकर, श्रीकांत बोजेवार, अतुल कुलकर्णी, अशोक कोठावळे, सुदेश हिंगलासपुरकर, दिनकर गांगल, कुमार केतकर, अरुण शेवते, अक्षय बर्दापूरकर, कमलेश सुतार, प्रसाद मिराजदार, प्रभू कापसे, वैद्य परीक्षित शेवडे यांच्यासह अनेक लेखक, साहित्यिक, प्रकाशक आणि इतर मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
१५ ते १९ जानेवारी दरम्यान निघणार ग्रंथदिंडी…
या सोहळ्याच्या निमित्ताने शहरातील ३०हून अधिक शाळा त्यांच्या माध्यमातून १५ ते १९ जानेवारी दरम्यान ग्रंथदिंडी काढणार असून त्यामध्ये सुमारे १५ हजार विद्यार्थी सहभागी होतील. तसेच पै फ्रेंड्स लायब्ररी आणि आयोजकांच्या माध्यमातून १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता इंदिरा गांधी चौकातून मानपाडा चार रस्ता, टिळक चौक, सर्वेश हॉल, फडके रोड गणेश मंदिर या मार्गावर ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.
कॉफी टेबल बुक
यानिमित्त फ्रेंड्स लायब्ररी एक कॉफी टेबल पुस्तकाचे अनावरण करणार असून त्यात जवळपास ७५ मान्यवरांचे लेख आहेत, आझादी के ७५ साल या थीमवर आधारित ते पुस्तक प्रसिद्ध होणार असून त्याचे अनावरण शुभारंभाच्या दिवशी होणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
या संदर्भात माहिती देण्याकरिता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला मंत्री चव्हाण यांच्यासह केडीएमसीच्या अभियंता रोहिणी लोकरे, विंदा भुस्कुटे, दीपाली काळे, दर्शना सामंत, धनश्री साने, ललिता छेडा, प्रवीण दुधे, प्रभू कापसे आदींसह मान्यवर उपस्थित होते.