डोंबिवली दि.४ जानेवारी :
गेल्या काही वर्षांत रिक्षा व्यवसायात फोफावलेल्या अपप्रवृत्तीमुळे लोकांच्या मनात रिक्षाचालकांबद्दल नकारात्मक चित्र तयार झाले आहे. मात्र एका महिलेची रिक्षात राहिलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग रिक्षाचालकाने परत करून या नकारात्मक प्रतिमेला छेद दिला आहे. (The ‘rich minded’ rickshaw puller ; Return the gold ornaments to the woman)
‘संतोष राणे असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव असून तो डोंबिवलीतील गरीबाचा वाडा येथे राहतो. तीन दिवसांपूर्वी म्हणजेच १ जानेवारी २०२३ रोजी डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या दिपाली राजपूत यांनी दुपारच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी ‘श्रम साफल्य बंगला’ येथून रिक्षा पकडली. रेल्वे स्टेशनला पोहोचल्यावर उतरताना त्या ५ तोळे सोन्याचे दागिने असणारी बॅग रिक्षातच विसरल्या. मात्र तोपर्यंत रिक्षा निघून गेल्याने त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. आणि त्यांनी संबंधित रिक्षा शोधण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर शोधाशोध सुरु केली.
मात्र ती रिक्षा किंवा रिक्षाचालक तिथून निघून गेल्याने अखेर राजपूत यांनी रिक्षा स्टँडवर जाऊन चौकशी करत झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष भगवान मोरजकर, राजा चव्हाण यांनी त्वरित त्या रिक्षाचा शोध सुरू केला. मात्र अवघ्या काही मिनिटांतच रिक्षाचालक संतोष राणे स्वतःहून दागिन्यांच्या बॅगेसह त्या पदाधिकाऱ्यांसमोर हजर झाला. आणि आपल्या रिक्षेत एक बॅग सापडली असून त्यात सोन्याचे दागिने असल्याचे सांगितले. हे ऐकल्यावर राजपूत यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांनी तातडीने ही सोन्याच्या दागिन्यांची बॅग राजपूत यांच्या स्वाधीन केली.
दरम्यान रिक्षा चालक संतोष राणे यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल ठाणे पोलीस आयुक्तांसह अनेक मान्यवरांनी त्याचे कौतुक केले आहे.