कल्याण दि.3 जानेवारी :
महावितरणमधील कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांच्या विविध संघटना बुधवारी मध्यरात्रीपासून (दि. 4, 5 आणि 6 जानेवारी २०२३) ७२ तासांच्या संपाची हाक दिली आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडलातील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मुख्य अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तयारी करण्यात आली आहे. मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार परिमंडलातील कल्याण एक आणि दोन, वसई आणि पालघर या चारही मंडल कार्यालयात संप काळासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. (Maha Distribution Officer-Employees strike; Control room operational in Kalyan Circle, these are the numbers)
संपाच्या कालावधीत वीजपुरवठा बाधित होणे, अपघात, वीज यंत्रणेचे नुकसान अथवा अपघात यासंदर्भात आपापल्या कार्यक्षेत्रातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती देण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
संप काळात यांची घेण्यात येणार मदत…
आपल्या विविध मागण्यांसाठी महावितरण कर्मचारी, अधिकारी, अभियंते तसेच कंत्राटी कामगार आपापल्या संघटनांमार्फत या संपात सहभागी होत आहेत. त्यामुळे या संपात सहभागी न होणारे कर्मचारी, अभियंते, अधिकारी याशिवाय देखभाल-दुरुस्तीसाठीच्या एजन्सीसह इतर कंत्राटदारांचे कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांच्या मदतीने संप काळात वीजपुरवठा अबाधित ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.
कल्याण मंडल कार्यालय एकसाठी…
कल्याण पश्चिम आणि पूर्व, डोंबिवली या विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एकसाठी स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाचे मोबाईल क्रमांक 8879626138 आणि 8879626139 आहेत.
कल्याण मंडल कार्यालय दोनसाठी…
तर उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, मुरबाड, शहापूर आदी भागांचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय दोनसाठी नियंत्रण कक्षाचे 8879626969 आणि 9004696511 हे मोबाईल क्रमांक आहेत.
वसई विरार पालघरसाठी…
वसई, विरार, नालासोपारा, आचोळे, वाडा भागाचा समावेश असलेल्या वसई मंडल कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचे 7875760601 आणि 7875760602 हे मोबाईल क्रमांक आहेत. तर पालघर, बोईसर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा आणि विक्रमगडचा समावेश असलेल्या पालघर मंडल कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचे 9028005994 – 9028154278 हे मोबाईल क्रमांक महावितरणतर्फे जारी करण्यात आले आहेत.
नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक संप कालावधीत २४ तास सुरू राहणार आहेत. वीजेसंदर्भातील तक्रारी किंवा माहिती देण्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.